महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार; उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेंची माहिती

By आशपाक पठाण | Published: July 30, 2023 06:22 PM2023-07-30T18:22:08+5:302023-07-30T18:22:23+5:30

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयात शिबीर घेण्यात येणार आहेत. 

Students will receive the income certificate at school itself Information of Sub Divisional Officer Rohini Narah | महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार; उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेंची माहिती

महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार; उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेंची माहिती

googlenewsNext

लातूर : शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणारे महसूल विभागाकडील जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवास, अधिवास, नॉनक्रिमीलियर, ईडब्ल्यूएस ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना शाळेतच दिली जाणार आहेत. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहानिमित्त हा उपक्रम दहा शाळेत राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. राज्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्यसाधून ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयात शिबीर घेण्यात येणार आहेत. 

उपविभागीय अधिकारी, लातूर यांच्यामार्फत अर्ज वितरण व स्विकृती केले जातील. ज्या शाळेत शिबीर आहे, त्याच ठिकाणी महसूलचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, महा-ई-सेवा केंद्रातील दोन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, यासाठी लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, लातूर शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेऊन सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यांना प्रमाणपत्र काढायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत जावे, असे आवाहन करण्यात आले. महसूल सप्ताहानिमित्त सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शाळेत होणार शिबीर...
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत लातूर शहरातील राजस्थान विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय, संस्कार वर्धिनी विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, पोतदार इंटरनॅशनल स्कुल, बसवेश्वर महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, मुरूड येथील जनता विद्यालय तसेच २ ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या डीपीडीसी हॉलमध्ये युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.

उपयुक्त प्रमाणपत्र काढून घ्यावेत...
शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी या सप्ताहात काढून घ्यावीत. यासाठी शाळेतच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षातही हे प्रमाणपत्र कामाला येतात. इतर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांनाही इथे सुविधा मिळणार आहे. सात दिवस तलाठी, महा ई सेवाचे केंद्राचे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी सांगितले.
 

Web Title: Students will receive the income certificate at school itself Information of Sub Divisional Officer Rohini Narah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.