लातूर : शिक्षकांना अध्यापनाबरोबर अन्य अशैक्षणिक कामे लावण्यात येत असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात शिक्षकांना अन्य कुठलीही कामे लावण्यात येऊ नयेत, असा ठराव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, सीईओ अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जि.प. सदस्य संजय दोरवे, रामचंद्र तिरुके यांनी राष्ट्र निर्मितीचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना इतर विविध कामे लावली जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना माहित नसलेली कामेही करावी लागतात. त्यामुळे अध्यापनाशिवाय अन्य कामे लावू नयेत, असा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून आदर्श शिक्षक, शेतकरी, पशुपालक यांचे पुरस्कार वितरण रखडले आहेत. आपल्या कार्यकाळात त्याचे वितरण व्हावे, अशी मागणी रामचंद्र तिरुके व माधव जाधव यांनी केली असता लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होईल, असे अध्यक्ष केंद्रे व सभापती चिलकुरे यांनी सांगितले. सदस्य डॉ. संतोष वाघमारे यांनी पाणी पुरवठ्याचे कर्मचारी वेतनापासून वंचित असल्याचे सांगून त्यांना तात्काळ व सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचा ठराव मांडला. तोही मंजूर करण्यात आला.
भूमिपूजनास उपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करा...उदगीरात सोमवारी झालेल्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारत कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचे सांगत सभापती ज्योतीताई राठोड आक्रमक झाल्या. तेव्हा तिरुके यांनी हा लोकप्रतिनिधींचा अवमान असल्याचे म्हणाले. दरम्यान, सभापती चिलकुरे, डॉ. वाघमारे संजय दोरवे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचा-यावर कारवाईची मागणी केली. तेव्हा सीईओ गोयल यांनी सदर कार्यक्रमास अधिकारी होते की नाही, याची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले. मात्र सदस्य आक्रमक असल्याने सदरील कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.