लातूर : पुढील वर्षीच्या प्रशासकीय बदलीतून सहजरीत्या सुटका व्हावी आणि लातूर शहर व नजिकच्या तालुक्यात आपले बस्तान काही वर्षे कायम रहावे म्हणून जिल्हा परिषदेतील जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी आपसी बदलीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, सीईओंनी या कर्मचाऱ्यांचा चलाखीपणा ओळखून विनंतीवरून आपसी बदल्याच केल्या नाहीत. परिणामी, या कर्मचाऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे.
लातूर शहर व तालुक्यात तसेच नजिकच्या औसा, रेणापूर आणि शेवटचा पर्याय म्हणून चाकूर तालुक्यातील मुख्य मार्गावरील ठिकाणच्या गावांत कार्यरत राहण्यास बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ओढा असतो. घर लातुरात आणि नोकरी जवळच्या तालुक्यात. त्यामुळे वेळेत नोकरीच्या ठिकाणी जाऊन लवकरच घरात पोहोचण्याची सोय होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असा नियम असला तरी बहुतांश जण नियमाचे किती पालन करतात, अशी मानसिकता असते.
गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या होत आहेत. या बदलीदरम्यान, लातूर, रेणापूर, औसा या तालुक्यात कार्यरत असलेल्या काही विभागाचे काही कर्मचारी पुढील वर्षी प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी यंदापासूनच या तीन तालुक्यांशिवाय अन्य ठिकाणी जाण्याची पाळी येऊ नये म्हणून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या दक्षतेमुळे त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.
आपसी बदलीमुळे १० वर्षे निवांत...जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली ही १० वर्षानंतर होते. दरम्यान, लातूर, औसा, रेणापूर येथे कार्यरत आणि ८ ते ९ वर्षे पूर्ण होत असलेल्या जवळपास ४२ कर्मचाऱ्यांनी पुढील वर्ष, दोन वर्षातील प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसी बदलीचा प्रस्ताव सादर केला होता. एकदा आपसी बदली झाली की प्रशासकीय बदलीसाठी पुढे १० वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत निवांत राहता येते, असे कर्मचाऱ्यांचे धाेरण होते. मात्र, सीईओ गोयल यांनी या कर्मचाऱ्यांचे नियोजन ओळखून आपसी बदल्या न करण्याच्या सूचना केल्या.
शोधाशोध केली, पण काय उपयोग ?आपसी बदलीसाठी एकाच ठिकाणी ५ वर्ष कार्यरत राहण्याची अट असते. त्यामुळे पुढील वर्ष, दोन वर्षात प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरणाऱ्यांनी आपसी बदलीसाठी या तीन तालुक्यातील कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली. शिवाय काही तडजोडी ही केल्या. पण, सीईओंनी आपसी बदल्या न केल्याने काहीही उपयोग झाला नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
प्रशासकीय बदलीत ठिकाण अनिश्चित...जिल्हा परिषदेत समुपदेशनाने बदल्या होत आहेत. प्रशासकीय बदली वेळीही कर्मचाऱ्यांना रिक्त जागा दाखविण्यात येतात. मात्र, कुठे नियुक्ती द्यायची याचे काही अधिकार सीईओंना आहेत. त्यामुळे काही कर्मचारी प्रशासकीय बदली टाळण्यासाठी आपसीचा मार्ग निवडतात. यंदा एकही आपसी बदली झाली नाही.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.