उदगीर (जि. लातूर) : सासरच्या लाेकांनी माहेरहून पिकअप वाहन खरेदीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, तसेच मूल हाेत नाही म्हणून सतत छळ केला. या छळाला कंटाळलेल्या एका विवाहितेने सोमवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर येथील जन्नतचा विवाह उदगीर तालुक्यातील हैबतपूर येथील निजाम शेख यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक वर्षापर्यंत तिला चांगले नांदविण्यात आले. त्यानंतर तिला मूल होत नाही म्हणून सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. त्याबरोबर पती निजाम शेख याला पिकअप वाहन खरेदीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत तगादा लावला. सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळलेली विवाहिता जन्नत निजाम शेख यांनी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हैबतपूर येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
याबाबत मयत विवाहितेची आई मुमताज खुर्शीद शेख (रा. चाकूर, जि. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पती निजाम शेख, सासरे शेख गफार, सासू मुन्नाबी शेख, रहीम शेख, अजीम शेख, जहूर शेख, तस्लीम शेख, नस्मूल शेख यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत आहेत.