आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलीचा खून; पित्याला जन्मठेपेची शिक्षा
By राजकुमार जोंधळे | Published: November 18, 2022 06:49 PM2022-11-18T18:49:07+5:302022-11-18T18:49:34+5:30
याबाबत मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भादा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
लातूर : आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मुलीचा (वय १५) खून करणाऱ्या आरोपी पिता सुधीर शंकर बंडगर (वय ४० रा. आशिव ता. औसा) याला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
औसा तालुक्यातील आशिव येथे १५ नोव्हेंबर २०२० रोजी सुधीर बंडगर याचा त्याच्या पत्नी सोबत सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी त्यांची पंधरा वर्षीय मुलीने मध्यस्थी करण्यासाठी समोर आली. यावेळी मुलीच्या दिशेने दगड फेकून मारला. तो दगड मुलीच्या डोक्यात लागल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भादा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तातडीने सुधीर शंकर बंडगर याला अटक केली. गुन्ह्याचा तपास भादा ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी केला. तपासादरम्यान, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून प्रत्यक्ष साक्षीदार तपासून गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. पोलिसांनी तपासात जमा केलेले साक्ष आणि पुरावे त्याचबरोबर सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजाराचा दंड शिक्षा ठोठावली. न्यायालयाने १७ नोव्हेंबर रोजी हा निकाल दिला. गुन्ह्याचा तपास सपोनि. संदीप भारती यांनी केला. तर सपोनि. विलास नवले यांनी सहकार्य केले. खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील एस.एस. रांदड, मॉनिटरिंग सेलचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड आणि पैरवीचे काम अंमलदार पुष्पा कोरे यांनी पाहिले.