उदगीर (जि. लातूर) : येथील नगरपालिकेच्या समोर राहत असलेली घिसाडी समाजातील तीन अल्पवयीन मुले गुरुवारी शहरातून गायब झाली होती. दरम्यान, ती मुले पुणे येथे शुक्रवारी सापडली आहेत.
उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे म्हणाले, शहरातील नगरपालिकेच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला राहत असलेल्या घिसाडी समाजातील मुले गुरुवारी दुपारी गायब झाल्याची फिर्याद अंकुश चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आंदोरीकर यांच्यासह संजय दळवी, स्थानिक गुन्हा शाखेचे राजकुमार घोरपडे, योगेश फुले ,गजानन पुल्लेवाड, मच्छिंद्र वरटी, मारोती जायभाये यांनी तपास लावून सदरील अल्पवयीन मुले पुणे येथे असल्याची माहिती समजली. त्यानंतर त्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.