वाहनधारक त्रस्त : गादवड ते सारसा रस्त्यासाठी वाढली ओरड
लातूर : तालुक्यातील गादवड ते सारसा मार्गावर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. जवळपास दोन किलोमीटरचा मार्ग खडतर बनला असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. मागील दोन वर्षापासून रस्त्याची अवस्था दयनीय झालेली असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांतून होत आहे.
अंबाजोगाई मार्गाने येणारी अनेक अवजड वाहने मुरूड अकोला, शिराळा, बोरगाव काळे, लातूर आदी गावांना जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून वाहनधारकांना जवळपास दोन किलोमीटर रस्त्यावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्डे वाढल्याने अनेकदा दुचाकीस चारचाकी वाहनांना याचा फटका बसला. पाण्यात खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने अपघाताच्या घटना घडल्या. या मार्गावर रहदारी वाढलेली असून गादवड व सारसा दोन्ही गावातून आतमध्ये जाणारा रस्ता काही अंतरापर्यंत चांगला असून पुढे खडतर मार्गावरून जाताना वाहनधारकांना पश्चाताप व्यक्त करावा लागत आहे.
खड्डे तरी बुजवावेत...
गादवड ते सारसा मार्गावर जवळपास दोन किमी रस्ता खड्डेमय झाला असून वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने मार्गावरील किमान खड्डे तरी बुजवून घ्यावेत, जेणेकरून वाहनधारकांसह शेतकरी बांधवांची सोय होईल, अशी मागणी टाकळगावचे माजी उपसरपंच विनोद कदम, महादेव भिसे, ज्ञानेश्वर भिसे, मनोज पवार आदींनी केली आहे.