लातूर : तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचल्याने जीवाची काहिली होती आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. दरम्यान, अवैधरित्या पाणीउपसा रोखण्यासाठी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. काही गावांनी तर हिवाळ्याच्या अखेरीसच अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले. तद्नंतर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यापासून तर रविराजा राैद्ररुप धारण करु लागल्याने दुपारच्या वेळी जीवाची काहिली होत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे सकाळी ११ वा. पासून रस्त्यावरील वाहतूक अत्यंत कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. उन्ह वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जलसाठा झपाट्याने खालावत आहे.
मसलगा प्रकल्पात सर्वाधिक साठा...प्रकल्प - जलसाठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - ६.७१तिरु - ००देवर्जन - ८.५१साकोळ - १३.७०घरणी - ९.४२मसलगा - २१.४५एकूण - ७.२२
प्रत्यक्षात उपयुक्त साठा ८ दलघमी...सध्या जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपयुक्त साठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात १.३८०, देवर्जनमध्ये ०.९०९, साकोळमध्ये १.५००, घरणीत २.११७ तर मसलगा मध्यम प्रकल्पात २.९१७ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. एकूण ८.८२३ दलघमी पाणी शिल्लक आहे.
लघु तलावात ९ टक्के पाणी...जिल्ह्यात एकूण १३४ लघु तलाव आहेत. त्यामध्ये सध्या २९.१५२ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची ९.२८ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, तिरु हे तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.
जिल्ह्यातील १६८ गावांना अधिग्रहणाचे पाणी...सध्या जिल्ह्यातील ३०१ गावे आणि ५१ वाड्या अशा एकूण ३५२ गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४८३ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १६८ गावांना १८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मंजुरीसाठी २१५ गावांचे आणि ३९ वाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
१० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...जिल्ह्यातील २३ गावे आणि ३ वाड्या अशा एकूण २६ गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी १० गावांना १० टँकर मंजूर करण्यात येऊन ते सुरु करण्यात आले आहेत.