अहमदपूर : सध्या उन्हाळा असल्याने विवाह मुहूर्त आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे शासनाने या सोहळ्यांवर निर्बंध लागू केले आहेत. उपवर-वधूस केवळ दोन तासांत आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हौसेला मुरड घालावी लागत आहे.
जानेवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच मार्च आणि एप्रिलमध्ये तर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. नियम अधिक कडक झाले. याच काळात विवाह तिथी असल्यामुळे दिवाळीअगोदर जमवून ठेवलेले विवाह सोहळे आता दोन तासांत आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत उरकावे लागत आहेत. त्यामुळे वधू-वर व त्यांच्या पाहुण्यांना आपल्या हौसेला मुरड घालावी लागत आहे.
मंगल कार्यालयाऐवजी घरासमोरच अथवा एका छोट्या हॉलमध्ये विवाह सोहळे उरकले जात आहेत. बस्ता, वाजंत्री, व्हिडिओ शूटिंग अशा बाबींना फाटा दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील मंदी आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. काही वधू-वर पित्यांनी वैशाखातील विवाह तारखा काढल्या आहेत. काही तारखा एप्रिलमध्ये होत्या. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आहे त्या परिस्थितीत विवाह उकरण्याचा विचार सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून तालुक्यात दहा विवाह सोहळे झाले. दोन तासांत आणि अवघ्या काही पाहुण्यांच्या उपस्थितीत ते झाले. केवळ सोशल मीडियावर विवाह सोहळा झाल्याचे फोटो पाहावयास मिळत आहेत.
पालिका, महसूलला पूर्वसूचना महत्त्वाच्या..
विवाह सोहळा हा दोन तासांत आणि ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, ज्या तारखेस विवाह आहे, त्या तारखेस विवाह असलेले ठिकाण, वधू-वरांची नावे व त्या संबंधीचा एक स्वीकृती अर्ज पालिका, महसूल व पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे यांनी सांगितले.
४ मे, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ मे, १ जून, ६, ८, ११, १३, १४, १५, १६, १८, २२ जून, ३ जुलै, ५, ६, ७, ८, ९ जुलै अशा यंदाच्या विवाहाच्या तारखा असल्याचे राजकुमार स्वामी यांनी सांगितले.