लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ७ वर्षे पूर्ण होत आहेत़ सध्या या प्रकरणाचा तपास देशातील विविध पाच तपास यंत्रणांकडून होत आहे़ तरीही डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचे ठोस पुरावे मिळाले नाहीत की, सूत्रधार हाती लागलेला नाही़ त्यामुळे अंनिसने २० ऑगस्टपासून ‘सूत्रधार कौन?’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेतले आहे़
डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा, असा आग्रह अंनिसचा सलग ७ वर्षांपासून आहे़ मागील वर्षापर्यंत ‘जबाब दो’ हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले़ यावर्षी ‘सूत्रधार कौन?’ हे अभियान राबविले जात आहे़ गुरुवारी डॉ़ दाभोलकर यांना अभिवादन करुन या अभियानाची सुरुवात होणार आहे़ तत्पूर्वी, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविले जाणार आहे.
अभिवादन, सभा, निषेध ऑनलाईन पद्धतीने़अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट रोजी स्मृतिदिन आहे़ त्यांच्या खुनाचा तपास अद्याप लागला नसल्याने निषेध, सभा व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत़ २० आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० वाजता राज्यभरातील कार्यकर्ते आपापल्या घरीच डॉ़ दाभोलकर यांना अभिवादन करतील. सायंकाळी ५़३० ते ७़३० या वेळेत फेसबुक पेजवर लाईव्ह अभिवादन कार्यक्रम होणार आहे़ यावेळी गिरीश कुबेर यांचे व्याख्यान होईल़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांची उपस्थिती राहील, तर चर्चेत कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, प्रा़ मेघा पानसरे, अॅड़ मनीषा महाजन सहभागी होणार आहेत़ समारोप राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील करणार आहेत़.