लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : दिवसेंदिवस महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. मात्र, ग्रामीण भागात महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक असलेले कोतवाल हे तुटपुंज्या मानधनावर आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. कोतवालांना मिळणारा चप्पल भत्ता केवळ दहा रुपये असून, महागाईच्या काळात दहा रुपयात खरंच चप्पल मिळते का हो? असा प्रश्न कोतवालांमधून विचारला जात आहे.
गावस्तरावर महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक म्हणून कोतवालांना ओळखले जाते. तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करण्याचे काम कोतवाल करतात. गेल्या अनेक वर्षांपासून कोतवालांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना आजही अल्प मानधनावरच काम करावे लागत आहे. शासनाकडे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्याला यश आलेले नाही. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून कोतवालांना पदोन्नतीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोतवालांच्या प्रश्नांची शासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.
२०११पासून पदोन्नती नाही...
राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. मध्यंतरी कोतवाल संघटनेच्यावतीने आंदोलनही करण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यरत असलेल्या कोतवालांना गेल्या १० वर्षांपासून पदोन्नतीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील कोतवालांना काम करावे लागत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कामांची यादी भली मोठी...
गावस्तरावर महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करणे.
दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे.
दुष्काळ यादी, गावातील नुकसानाची माहिती प्रशासनाला देणे, त्यांना सहकार्य करणे.
गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची देखभाल करणे आदी कामे कोतवालांना करावी लागतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष...
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कोतवालांना पदोन्नती देण्याची शिफारस आहे. मात्र, मागील दहा वर्षांपासून कोतवालांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाने तरी याबाबत निर्णय घेण्याची मागणी कोतवालांमधून होत आहे. गावातील नुकसान, दुष्काळ, घटनांची माहिती प्रशासनाला देण्याचे काम कोतवाल करतात. कोरोनामुळे अतिरिक्त कामही वाढले आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अपुऱ्या मानधनावर कसे भागणार...
निजामकाळापासून कोतवाल पद आहे. कोतवाल तुटपुंज्या मानधनावर महसूल विभागात २४ तास काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून मानधनाची मागणी आहे. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाडा कसा चालवणार. त्यातच चप्पल भत्ता दहा रुपये दिला जातो. सध्याच्या महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड झाले आहे. - अंबादास यामजले, जिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना, लातूर
कोतवालांना तलाठी सजा, गावस्तरावर विविध कामे करावी लागतात. मात्र, शासनाकडून अल्प मानधन दिले जाते. ग्रामीण भागात महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक म्हणून कोतवाल ओळखले जातात. वेतनाचा प्रश्नही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन कोतवालांचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. - विवेकानंद पांचाळ, उपाध्यक्ष, कोतवाल संघटना