गणेशोत्सवात आझादी का महोत्सवाचे देखावे करावेत; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर
By आशपाक पठाण | Published: July 27, 2023 07:34 PM2023-07-27T19:34:25+5:302023-07-27T19:34:38+5:30
नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.
लातूर : आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही मंडळांनी यावर देखावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.
नूतन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, लातूर हे शैक्षणिक, ॲग्रीकल्चर हब आहे, ही आपल्या जिल्ह्याची ताकद आहे. जल व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम केले जाईल. जोपर्यंत मालकी हक्क, आर्थिक नियोजनात महिलांचा वाटा वाढत नाही तोपर्यंत त्या समक्ष होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू. यावेळी नूतन सीईओ अनमोल सागर म्हणाले, आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. यानिमित्त आदर्श अमृत वाटिका तयार केली जाणार असून यात गावांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी महाडीक, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुचिता शिंदे यांची उपस्थिती होती.
जळकोटमध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया...
जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने अनेक शेतकरी, घरांचे मोठे नुकसान झाले. याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून तिथे आता अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीत आपत्कालीन विभाग सक्षम केला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
बीएलओ रुजू न झाल्यास कारवाई...
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान घरोघरी भेटी देणार आहेत. मतदान नोंदणी न झालेले पात्र नागरिक संभाव्य मतदार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व अस्पष्ट फोटो असणारे मतदार याचे सर्वेक्षण करणार आहेत. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गैरहजर असलेल्या १४ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बीएलओंनी तात्काळ रुजू होऊन काम सुरू करावे. रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.
महिला मतदारांची नोंद वाढायला हवी...
महिलांचे मतदान नोंदणीत प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. माहेरवासीयांनी सासरी आल्यावर आवर्जून आपली मतदार नोंदणी करावी. नवीन मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढावे, यासाठी महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केले.