उदगीर : रानडुकरे व हरणांचे कळप शेतात पेरणी केलेले सोयाबीन व अन्य खरिपाची उगवण झालेली पिके खाऊन नष्ट करीत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्ही वन्यजीव प्राण्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्यामुळे या दोन्ही प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊन खरिपाची पिके फस्त करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शिवाय गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडीदचा पेरा कमी केला आहे. यामुळे सोयाबीनचा पेरा ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरून ४६ हजार हेक्टरपर्यंत गेला आहे. सोयाबीन व तूर पिकांची उगवण होऊन या पिकांची वाढ सुरू असतानाच रानडुकरे व हरणांचे कळप ही पिके फस्त करीत आहेत. कहर म्हणजे या दोन वन्य प्राण्यांसह गोगलगाय व बंदा नाणे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. हरणांचे कळप व रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उगवण झालेल्या पिकांची पाने खाऊन फस्त करीत आहेत. रानडुकरे या पिकासह उभ्या उसाचे मोठे नुकसान करीत आहेत. सायाळ हे नवीन लागवड केलेली आंबा, वड, पिंपळ, कडूनिंबाची रोपे मुळासकट खाऊन नष्ट करीत आहेत. दरम्यान, वन्यजीवांना कोणालाही पकडता व मारता येत नाही, असे वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे यांनी सांगितले.
सूर्यदर्शन नसल्यामुळे आंतरमशागत थांबली...गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतातील पिकांच्या खुरपणा व्यतिरिक्त गोगलगाय व बंदे अळी वेचण्यासाठी मजुरांना वेगळी रक्कम मोजावी लागत आहे. तणनाशक फवारणीसाठीही पावसाने उघडीप देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अनुदानाऐवजी तारेचे कुंपण करून द्यावे...शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान देण्याऐवजी त्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून देण्यात यावे. वन्यजीवांना पकडता व मारता पण येत नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून द्यावे. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या योजनेत शेतीला तारेचे कुंपणाची योजना नसल्यामुळे आजघडीला शेतकऱ्यांना एखादी योजना नाही मिळाली तरी चालेल; मात्र शेतीला तारेच्या कुंपणाची खरी गरज असल्यामुळे शासनाने यावर निर्णय घ्यावा. - बाबासाहेब पाटील, शेतकरी, हेर