तुमचा/तुमची पार्टनर तुमची फसवणूक करतोय याचे १० संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 10:34 AM2018-03-31T10:34:18+5:302018-03-31T10:34:18+5:30

तुमचा किंवा तुमची पार्टनर तुमचा विश्वासघात करत आहेत हे कसं ओळखाल याचे काही संकेत... हे जे संकेत आहेत हे केवळ कुणा एकासाठी नाहीतर दोघांनाही लागू आहेत. 

10 signs that your partner is cheating on you | तुमचा/तुमची पार्टनर तुमची फसवणूक करतोय याचे १० संकेत

तुमचा/तुमची पार्टनर तुमची फसवणूक करतोय याचे १० संकेत

Next

पती-पत्नी किंवा गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डच्या नात्यामध्ये विश्वास सर्वात महत्वाचा असतो हे काही वेगळं सांगायला नको. संसार किंवा प्रेमाचं नातं म्हटलं की, भांड्याला भांडं लागणारच...पण याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या विश्वासाला तडा द्यावा. पण हे अनेकांच्या बाबतीत होतं. काही गैरसमज, भांडणं यामुळे दोघांमध्ये वाद होतात आणि ते दुस-या आधाराचा शोध घ्यायला लागतात. आता तुमचा किंवा तुमची पार्टनर तुमचा विश्वासघात करत आहेत हे कसं ओळखाल याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे जे संकेत आहेत हे केवळ कुणा एकासाठी नाहीतर दोघांनाही लागू आहेत. 

१) तुमच्याकडे दुर्लक्ष करणे :

प्रेम म्हटलं की, भांडण आलंच...पण ही भांडणं बाजूला सारून समजूतदारपणा घेणं दोघांसाठीही महत्वाचं आहे. पण असं होताना दिसत नसेल तर मग नक्कीच काहीतरी घोळ आहे, असं समजा. तुमचा पार्टनर आधीसारखा मोकळेपणाने वागत नसेल, जर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, कितीही समजावल्यावरही समजत नसेल, त्याच्या वागण्यात वेगळेपणा दिसत असेल तर समजा की, तुमच्या पार्टनरला आता तुमच्यात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. 

२) फोन न बघू देणे : 

तुमचा/तुमची पार्टनर जर त्यांचा फोन कधीही तुमच्या हाती लागू देत नसेल तर समजा की, त्यात नक्कीच असं काहीतरी आहे जे तुम्ही बघू नये असं त्यांना वाटतं. खरंतर तुम्ही जर ऎकमेकांच्या प्रेमात असाल तर तुमच्यात काहीही लपवण्यासारखं असू नये. कारण त्यावरच नात्याचा पाया रचला जातो. त्यामुळे तुमच्या पार्टनरकडून असे होत असेल तर पार्टनरसोबत बोला, काय अडचण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. 

३) उडवा-उडवीची उत्तरे देणे :

तुमचा पार्ट्नर जर तुम्हाला कोणत्याही महत्वाच्या विषयावर उडवा-उडवीची उत्तरे देत असेल तर ही बाब गंभीर आहे. कारण तुमच्या पार्टनरने त्या विषयाचं गांभीर्य समजून घ्यायला हवं. पण तसं होत नसेल तर समजून घ्या तिच्या/त्याच्या आयुष्यातील तुमचं महत्व कमी झालं आहे. 

४) न सांगता बाहेर पडणे :

तुमचा पार्टनर तुम्हाला न सांगता बाहेर पडत असेल वरून कुठे गेला होतास? असं विचारल्यावर काहीही चुकीचं उत्तर देणे हे सुद्धा तुमचा पार्टनर करत असेल तर हा तुमचा पार्टनर तुमचा विश्वासघात करत असण्याचा संकेत असू शकतो. 

५) तुमचा चार चौघात सतत अपमान करणे :

खरंतर तुमचा पार्ट्नर जर तुमच्यात इंटरेस्टेड नसेल तर ते पटकन लक्षातच येईल. कारण त्याच्या वागण्यात मोठा बदल झालेला असेल. त्यासोबत जर छोट्या छोट्या गोष्टीवरून तो किंवा ती सतत चारचौघांमध्ये तुमचा अपमान करत असेल तर समजा की आता त्याला/तिला तुमच्यात अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. 

६) भेटणे टाळणे : 

तुम्ही प्रेमात आहात आणि आधीसारख्या भेटीगाठी होत नसेल तर समजून घ्या की, आता तुमच्या पार्ट्नरला तुमच्यात काहीही आधीसारखं खास वाटत नाही. कामात व्यस्त असल्याने भेट टाळणं एक वेळ समजू शकतं. पण नेहमीच असं होत असेल तर नेमकं पाणी कुठे मुरतंय याचा अंदाज घेतला गेला पाहिजे, नाहीतर समजून घ्या की, तुमच्या नात्याला आता वेगळं वळण मिळणार आहे. 

७) कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट न घेणे :

तुमचा पार्टनर जर तुम्ही दिलेल्या सरप्राईजवर रिअ‍ॅक्ट होत नसेल किंवा ती गोष्टच आवडलेली नसेल तर समजून घ्या काही तरी नक्की बिनसलंय. खरंतर एखादी गोष्ट खटकली असेल किंवा रूचली नसेल तर दोघांमध्ये संवाद होऊन गैरसमज दूर व्हायला पाहिजे. पण तसा प्रयत्नही होत नसेल तर तुमच्या पार्टनरला आता या नात्यात काहीही इंटरेस्ट राहिला नाही, असे समजा.

८)  घरात लक्ष न देणे : 

घरात जर दोघांपैकी एकाचही लक्ष नसेल, काय सुरू आहे याची माहिती नसेल, तर नक्कीच काहीतरी घोळ आहे असे समजा. आधीसारखा घराला-घरच्यांना तुमचा पार्टनर वेळ देत नसेल, आधीसारखं प्रेम राहिलं नसेल आणि सतत न सांगता किंवा खोटी कारण सांगूण बाहेर जात असेल तर समजा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतोय. 

९) प्रेमापेक्षा पैशाला महत्व देणे :

प्रेम हे असं नातं असतं ज्यात तुम्हा दोघांनाही ऎकमेकांना समजून घ्यायचं असतं. ऎकमेकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोबतीने सोडवायच्या असतात. पण जर तुमच्या पार्टनरला तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या, गरजा समजत नसेल आणि सतत तुमच्याकडे पैशांची किंवा सतत तुमची इच्छा नसतानाही तुमच्याकडे शारिरीक सुखाची मागणी करत असेल तर समजा तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नाही. तो केवळ तुमचा वापर करतो आहे. 

१०) शारीरिक संबंध : 

वैवाहीक जीवनात पती-पत्नीसाठी चांगल्या सेक्स लाईफचा अर्थ सुखी आणि निरोगी संसार असाही म्हणता येईल. पण जर दोघांपैकी एकातही काही समस्या असेल किंवा दोघेही ऎकमेकांच्या गरजा भागवू शकत नसाल तर ही गंभीर समस्या आहे. अशात तुमचा पार्टनर तुमच्यासोबत विश्वासघात करण्याची शक्यता अधिक असते. जर अनेक महिने तुम्ही शारिरीक संबंध ठेवत नसाल किंवा कुणी त्यात इंटरेस्टही दाखवत नसाल तर ही धोक्याची घंटा आहे. कदाचित तुमच्या पार्टनरला बाहेर दुसरं कुणीतरी मिळालं असावं असंही असू शकतं. 

खरंतर प्रेमाचं नातं हे दोघांच्या वागण्यावर, ऎकमेकांना समजून घेण्यावर टिकतं. पण जर दोघांमध्ये प्रेमच नाहीये आणि जबरदस्तीने ते नातं टिकवत असतील तर तुम्ही दोघेही एकमेकांना फसवत आहात. अशावेळी ओढूणताणून नातं टिकवण्यापेक्षा त्यावर दोघांनीही विचार करणं महत्वाचं ठरतं.

Web Title: 10 signs that your partner is cheating on you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.