तू आज फारच सुंदर दिसतीये, तुझं बोलणं खूप आवडतं, आज तुझा ड्रेस फार चांगला दिसतोय...अशा किंवा आणखीही काही चांगल्या गोष्टी मुलींना सांगितल्यास त्यांना आनंद होतो. पण याव्यतिरीक्त अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख तुम्ही मुलींकडे केला तर त्या रागाने लाल होतात. तरीही काही लोक त्या गोष्टी बोलणं सोडत नाहीत. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्या पुन्हा पुन्हा ऐकून मुली अक्षरश: वैतागल्या आहेत.
1) क्रिकेटचं तुला काय कळतं गं...!
अगं तुला काय माहीत क्रिकेट काय आहे? तू बस तूझ्या मेकअप आणि शॉपिंगकडे लक्ष देत. जेव्हा मुलींना असं बोललं जातं, तेव्हा त्यांचा पारा चांगलाच वाढतो. कदाचित असंही असू शकतं की, त्यांनाही क्रिकेटमध्ये किंवा त्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल. ही बाब लक्षात न घेताच असं बोलल्यावर राग येणार नाहीतर काय होणार?
2) मुलींना ड्रायव्हिंग कुठे येतं!
अरे बायका कशाही गाड्या चालवतात, त्यांना नीट गाड्या चालवता येत नाही....नेहमीच अशी बोलणी मुलींना ऐकावी लागतात. यावरून अनेकजण त्यांची खिल्लीही उडवताना दिसतात. पण आता जमाना बदलला आहे. एखाद-दुसरीच्या अनुभवावरून तुम्ही सर्वांना असं नाही ना बोलू शकत!
3) मुलगी असून जेवण बनवता येत नाही...
मुलगी असण्याचा अर्थ त्यांना जेवण बनवताच आलं पाहिजे असा होत नाही. तरीही मुलींना यावरून टोमणे मारले जातात. त्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविकच आहे.
4) मुलगी असून शिटी वाजवते....
मुलांनी शिटी वाजवली तर चालेल, पण मुलींनी नाही, असं कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे? हा नियम कुणी बनवला? असे प्रश्न मुलींकडून येण्याची जास्त शक्यता आहे. कारण असा नियम कुठेच नाहीये. त्यामुळे असं काही त्याना ऐकवलं तर त्या चिडणारच ना....
5) लग्न कर आणि सेटल हो....
तू मुलगी आहेस, त्यामुळे थोडंफार शिक आणि एखादा चांगला मुलगा मिळाला की सेटल हो...याला काय अर्थ आहे? असा विचार मुलींच्या मनात येऊन त्यांचा जळफळाट होतो.
6) हे तुम्हाला कुठे जमणार....ते तुम्हाला नाही जमणार....
मुलींना हे डायलॉग तर अनेकदा अनेक ठिकाणी ऐकावे लागतात. प्रत्येक वेळी त्यांना अशा अपमानाचा सामना करावा लागतो. पण अशी कशी कुणी मुलींची पात्रता ठरवू शकतात? त्यामुळे त्यांना या गोष्टीचा राग येणे सहज आहे.