Heath : मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव?... कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 03:50 PM2018-05-02T15:50:46+5:302018-05-02T15:50:46+5:30

कॉपर टी हेही मेनोरेजियाचं सर्वात महत्त्वाचे कारण असू शकते.

Menorrhagia heavy menstrual bleeding: Causes and treatments | Heath : मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव?... कारणं आणि उपाय

Heath : मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव?... कारणं आणि उपाय

googlenewsNext

- डॉ. नेहा पाटणकर 

बाई पडल्या... बाई पडल्या... एकच गलका झाला. सुनीता मॅडम गणिताचे प्रमेय फळ्यावर सोडवत असताना चक्कर येऊन पडल्या होत्या. गेली ४० मिनिटं त्यांनी बरीच उदाहरणं सोडवली होती. त्यांना वर्गभर चालत शिकवण्याची सवय होती. पण, आज आल्यापासून त्या सतत उभ्याच होत्या आणि एका क्षणी चक्कर येऊन पडल्या.

डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या वगैरे झाल्या. हिमोग्लोबिन कमी निघालं. चूक त्यांचीच होती. परीक्षा जवळ आल्या आहेत, अभ्यासक्रम संपवायचाय, घरातली जास्तीची कामं अशा सगळ्या कारणांनी डॉक्टरांकडे जायचं त्या पुढे ढकलत होत्या. मासिक पाळीच्या दिवसांत जास्त स्त्राव होत होता. गेले ३-४ महिन्यांपासून पाळीच्या दिवसांत दर दोन तासांनी पॅड बदलावं लागत असे. पाळी सात-आठ दिवस चालूच असायची. खूप मोठे 'क्लॉट्स' पडायचे. कधी कधी तर रात्रीचं पॅड बदलायलाही उठायला लागत होतं. पण, आज-उद्या करता-करता डॉक्टरांकडे जाणं लांबणीवर पडत गेलं आणि आज त्याची परिणती चक्कर येऊन कोसळण्यात झाली. हिमोग्लोबिन खूप कमी झाल्यामुळे चक्कर आली होती. गोळ्यांनी पटकन वाढलं नाही तर रक्त द्यावं लागेल असंही डॉक्टर म्हणाले.

वरील गोष्ट थोड्या फार फरकाने अनेकींच्या बाबतीत होत असते. मासिक पाळीला खूप जास्त रक्तस्त्राव होणे ही एक बऱ्याच जणींची तक्रार असते. त्याला वैद्यकीय परिभाषेत 'मेनोरेजिया' म्हणतात. या रक्तस्त्रावामुळे थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, दम लागणे असा सगळा त्रास सुरू होतो. 

मेनोरेजिया हे वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत आजारांचं दृश्य लक्षण असतं. काही प्रमुख कारणंः 
 
१. फायब्रॉइड्स
२. uterine polyps
३. एन्डोमेट्रिओसिस
४. हार्मोनल इम्बॅलन्स
५. थायरॉईड प्रॉब्लेम्स
६. PID म्हणजेच पेलविक इन्फलमेटरी डिसीज (प्रजननक्षम ऑर्गन्सचे आजार) 
   
IUD/कॉपर टी हेही मेनोरेजियाचं सर्वात महत्त्वाचे कारण असू शकते.

हल्ली पाठदुखी, मानदुखीसाठी टपाटप पेनकीलर्स घेण्याची सवय असते. या गोळ्यांचा साईड इफेक्ट 'मेनोरेजिया' हा असू शकतो. काही कारणाने ब्लड थिनरससारखी औषधं घेत असतील तर त्याचा डोस कमी करावा लागतो.अगदी कॅन्सर आल्याची वर्दी सुद्धा मेनोरेजिया मार्फत होऊ शकते.
 
मेनोरेजियामुळे येणारा थकवा, पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, दम लागणे या लक्षणांमुळे नेहमीच्या दिनक्रमावर परिणाम होतो असे लक्षात आले तर ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करून घ्यायलाच हवी. तसेच वर्षातून एकदा तरी कंप्लिट ब्लड काऊंट (CBC), पॅप स्मिअर अशा चाचण्या करणे आवश्यक असते. शेवटी आपले आरोग्य चांगले ठेवणे आपल्याच हातात असतं.
 

Web Title: Menorrhagia heavy menstrual bleeding: Causes and treatments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य