चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:18 AM2023-12-06T07:18:12+5:302023-12-06T07:18:42+5:30
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.
भोपाळ : चीप बसविलेले कोणतेही यंत्र हॅक करता येते. त्यामुळेच इव्हीएमच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यास मी २००३ सालापासून सातत्याने विरोध करीत आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भारतीय लोकशाहीवर नियंत्रण ठेवण्याची संधी व्यावसायिक हॅकरना द्यायची का, असा प्रश्न इव्हीएमच्या वापरामुळे निर्माण झाला आहे. त्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.
निकालाआधीच मते मिळण्याबाबतचे केले अचूक भाकीत
भाजपचे कार्यकर्ते अनिल छाजेड यांनी मतमोजणीच्या दोन दिवस आधी म्हणजे १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात खाचरौद विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला ९३ हजार व काँग्रेस उमेदवाराला ७७ हजार मते मिळतील असे म्हटले होते.
ती पोस्ट काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी शेअर केली आहे. निकाल लागला तेव्हा भाजप उमेदवाराला ९३,५५२ व काँग्रेस उमेदवाराला ७७,६२५ मते मिळाल्याचे निष्पन्न झाले. इतका अचूक निकाल भाजप कार्यकर्ता आधीच कसा काय सांगू शकला, असा सवाल दिग्विजयसिंह यांनी केला.