Kuno National Park: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी आली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्ता 'गामिनी'ने पाच पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. तसेच, त्यांनी या नवजात पिलांचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत मादी चित्ता आपल्या पिलांजवळ बसलेली दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मादी चित्ता गामिनीचे वय पाच वर्षे आहे. चित्ता प्रकल्पांतर्गत तिला दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. दरम्यान, या पिलांच्या जन्माबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी 'X' वर लिहिले की, "दक्षिण आफ्रिकेतील त्वालु कालाहारी रिझर्व्हमधून आणलेल्या पाच वर्षीय मादी चित्ता गामिनीने आज पाच पिलांना जन्म दिला. यासह भारतात जन्मलेल्या पिलांची संख्या 13 झाली आहे."
यादव पुढे म्हणतात, "सर्वांचे, विशेषत: वन अधिकारी, पशुवैद्यक आणि क्षेत्रीय कर्मचारी यांचे अभिनंदन. त्यांच्यामुळे चित्त्यांसाठी चांगले वातावरण निर्माण झाले. आता कुनोतील एकूण चित्त्यांची संख्या 26 झाली आहे.
यापूर्वी काही पिलांचा मृत्यूभारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी पीएम मोदींनी 2022 मध्ये चित्ता प्रकल्प सुरू केला होता. हा पंतप्रधानांचा महत्वकांशी प्रकल्प आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून 20 चित्ते भारतात आणले, त्यापैकी काही जणांचा विविध कारणाने मृत्यू झाला. पण, आता या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या कुनोमध्ये चित्त्यांची एकूण संख्या 26 आहे.