बहिणीच्या खात्यात पैसे, मामाच्या झोळीत मते..; ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:38 AM2023-12-04T05:38:49+5:302023-12-04T05:39:19+5:30
मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली होती . सात जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती.
कमलेश वानखेडे
नागपूर : मध्य प्रदेशात सत्ता वापसीचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मार्ग कठीण होता. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सत्ता परिवर्तनाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी 'लाडली बहना' योजना जाहीर करत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १२५९ रुपये टाकण्यास सुरुवात केली. 'बहना'च्या खात्यात दरमहा पैसे येऊ लागले आणि 'मामांची ' झोळी मतांनी भरत गेली.
मध्य प्रदेशात यावेळी महिला मतदारांची संख्या वाढली होती . सात जिल्ह्यांमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. 2 कोटी 72 लाख 33 हजार महिला मतदारांवर फोकस करीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लाडली बहना योजना जाहीर केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील प्रत्येक महिलेला लखपती करू, प्रत्येक महिलेला महिन्याचे दहा हजार रुपये कमवता येतील एवढे सक्षम करू अशी घोषणा करत महिला मतदारांना गळ घातली. एवढेच नव्हे तर लाडली बहना योजनेतून ज्या महिलांची नावे सुटली आहेत त्यांचीही नावे समाविष्ट केली जातील अशी घोषणा करीत संपूर्ण महिला शक्तीचे मन आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. मामांची ही योजना खरी 'गेमचेंजर ' ठरली.
ही ठरली महत्त्वाची कारणे...
ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने शक्ती पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यासह ३९ स्टार प्रचारक नेते मैदानात उतरले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः १६० रोडशो केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रचारात जीव ओतला.
महाकौशल या विभागातील ३८ पैकी २४ जागा गेल्यावेळी काँग्रेसने जिंकल्या होत्या. या जागा परत मिळवण्यावर भाजपने फोकस केला. बहुतांश जागा जिंकत सामना फिरवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला.
कमलनाथ यांनी एकाकी किल्ला लढविला. छिंदवाडा जिल्ह्यातील सर्व सात जागा जिंकून कमलनाथ यांनी आपले प्रभुत्व सिद्धही केले. पण त्यांचे 'मुख्यमंत्री' कार्ड त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवू शकले नाही.