मुंबई - राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले आहे. उर्वरित वाड्यापाड्यांत व घरांना सौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून डिसेंबर २०१८पर्यंत वीज देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे.ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ असून, त्यापैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरांत वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के आहे. उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दीनदयाल योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार आहे. मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून, या सर्व गावांत वीज पोहोचली आहे. २०१८मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचा यात समावेश आहे.वाड्यापाड्यांची संख्या १ लाख ६ हजार ९३९ असून, त्यापैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांत यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली आहे. उर्वरित १ हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दीनदयाल योजनेतून व ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८पर्यंत वीजजोडणी देण्यात येणार आहे.
राज्यात १ कोटी ३७ लाख घरांचे झाले विद्युतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:23 AM