व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १०५ जोडपी विभक्त, घटस्फोटाची प्रकरणे सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:06 AM2019-02-05T02:06:25+5:302019-02-05T02:07:01+5:30
महत्त्वाच्या कामांमुळे तारखेला हजर राहणे शक्य नसलेल्या दाम्पत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) नाते संपविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे.
पुणे : महत्त्वाच्या कामांमुळे तारखेला हजर राहणे शक्य नसलेल्या दाम्पत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) नाते संपविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये कौटुंबिक न्यायालयातील १०५ दावे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यात घटस्फोटांची प्रकरणे सर्वाधिक आहेत.
राज्यच काय तर आता देश-विदेशातील जोडपेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) घटस्फोट घेत असल्याचे प्रकार वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. घटस्फोट घ्यायचा म्हटले की काही वर्षांपूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत. त्यात दोघेही तारखांना हजर राहणे गरजेचे असायचे. मात्र दोघांपैकी एखादा व्यक्ती काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही किंवा तो कामानिमित्त परदेशात असेल तर खटला पुढे ढकलला जात. तसेच पती किंवा पत्नी परदेशातील असेल तर तिला किंवा त्याला दावा दाखल केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक असायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. दोन्हींपैकी एक व्यक्ती जर न्यायालयात असेल तर व्हीसीद्वारे संवाद साधूनदेखील त्यांना घटस्फोट मिळत आहे.
वेळ व पैसा वाचतोय
निकाली लागलेल्या दाव्यांमधील अनेक पक्षकार हे परदेशामध्ये राहणार होते. त्यांना सुटी काढून किंवा भाडेखर्च करून खटल्याच्या प्रत्येक तारखेला येणे शक्य होत नाही. त्यामुळे या व्हीसीद्वारे त्यांच्याशी संवाद साधून खटला निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. या तंत्रज्ञानामुळे परदेशात असलेल्या पक्षकारांना फायदा होत असून, त्यांचा वेळा आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचत आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वकील आणि पक्षकारांच्या सोयीसाठी अनेक अद्ययावत तंत्रज्ञान कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे.
दिवसेंदिवस कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढत आहे. खटल्याच्या प्रत्येक तारखेला त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा पक्षकारांच्या सोयीसाठी व्हीसीचा आधार घेण्यात येत आहे.
स्काईप, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अगदी मोबाइलवर, संगणकावर व्हिडीओ कॉल करून ११ महिन्यांच्या कालावधीत १०५ दावे निकाली काढण्यात आलेले आहेत, अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.