लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले असून हे निर्देश पालिका शिक्षण विभागातील शिक्षकांनाही लागू आहेत. त्यानुसार कर्तव्यावर रुजू होण्यासाठी विलेपार्लेच्या प्राथमिक शिक्षकाने गोंदिया ते मुंबई असा ११०० किमी प्रवास दुचाकीवरून करून तब्बल ३ दिवसांनी मुंबई गाठली.
देवेंद्रकुमार नंदेश्वर असे या शिक्षकाचे नाव आहे. कामावर रुजू होण्याचे निर्देश मिळाले आहेत, मग ते कर्तव्य विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणाचे असो किंवा कोरोनाच्या ड्युटीचे असो. ते निष्ठेने पार पाडायचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सर्व शाळा बंद झाल्या. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नंदेश्वर कुटुंबासह गावी गेले. त्यानंतर आॅनलाइन शिक्षण आणि अनेक शाळांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सोय केल्याने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. अनेक शिक्षकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला असताना नंदेश्वर मात्र ३ मे रोजी गावाहून मुंबईला येण्याची इतर सोय नसल्याने आपली दुचाकी घेऊन निघाले. ५ मे रोजी मुंबई गाठून त्यांनी कामावर हजेरी लावली. वरिष्ठांनी सुरुवातीला जेवणाची व्यवस्था करीत आपुलकी दाखवली, असे ते म्हणाले
तर, मुंबई रेड झोनमध्ये असून शाळा सुरू करण्याचे नियोजन अजून तरी नाही. अनेक शिक्षक गावी आहेत. त्यांना तडकाफडकी बोलावणे योग्य नसल्याचे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी मांडले.