किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

By admin | Published: August 13, 2014 12:45 AM2014-08-13T00:45:02+5:302014-08-13T00:45:02+5:30

कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण

14 deaths due to kidney disease | किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

Next

जिल्हा परिषद : सायकल अन् जलशुद्धीकरण घोटाळा गाजला
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली.
मृतांमध्ये किसन शिवणकर, आनंदराव ढोणे, यमुनाबाई डहाट, शंकरराव वानखडे, केशवराव नारनवरे, किसन बाबडे, संतोषराव ढोणे, सूर्याबाई धुंदे, सुमित्रा वाडीवा , रावण सालमुरकर, रमेश मुनघाटे व हिरुबाई जुनघरे आदींचा समावेश आहे. तसेच स्मिताबाई बाबळे (५५) व किशनदेव जुनघरे (६०) यांच्यावर नागपुुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतरही अनेक लोकांना किडनीच्या आजाराने पछाडले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभारे यांनी केली.
गावातील पाणी नमुने तपासणीसाठी तातडीने प्रयोगशाळेकडे पाठवा, गावाला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून पर्यायी उपययोजना करण्याचे निर्देश उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. यात आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार असल्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चिखले यांनी दिली.
महिला व बाल कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या सायकल वाटपात लाखों रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकाच विद्यार्थ्यांच्या नावाने ८ ते १५ सायकली उचलण्यात आल्या आहेत. यामुळे जि.प.ची बदनामी होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही सायकली मिळाल्या नसल्याचे शांता कुमरे यांनी निदर्शनास आणले. तालुका स्तरावरून आलेल्या नावांनुसार यादी मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी अनुसूचित जातीचे लाभार्थी न मिळाल्याने त्यांना वाटप करता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केली.
शाळांना बंद असलेली जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आल्याच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. उपासराव भुते यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तेराव्या वित्त आयोगातून शाळांना ७७४ जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आली. ती चांगल्या कंपनीची नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आले. या यंत्रांचा शासन स्तरावरून पुरवठा झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याची सदस्यांना कल्पना न दिल्याबाबत जयकुमार वर्मा व उकेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
कन्हान येथील अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत चुकीचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. मनसर भागातील काही शाळांत विद्यार्थ्याच्या गणवेश वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुष्पा गायकवाड यांनी केला. शालेय गणवेशाची खरेदी स्थानिक स्तरावर व्यवस्थापन समिती करते. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.(प्रतिनिधी)

Web Title: 14 deaths due to kidney disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.