वीजपंपांसाठी १६०० कोटींची योजना
By admin | Published: August 3, 2016 03:43 AM2016-08-03T03:43:44+5:302016-08-03T03:43:44+5:30
राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली
मुंबई : राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली असून त्यासाठी निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
सातारा जिल्ह्यात कृषी पंपांच्या वीज जोडण्यांसाठी १४ हजार ६३६ अर्ज आलेले असतानादेखील केवळ ५ हजार ६७४ शेतकऱ्यांनाच जोडण्या देण्यात आल्या असल्याबाबतची लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी मांडली होती. यावेळी चव्हाण तसेच जयकुमार गोरे यांनी जोडण्यांअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे याकडे लक्ष वेधले. विदर्भ आणि मराठवाड्यात वीज पंपांचा २००५ पासूनचा अनुशेष होता तो आता दूर करून या दोन भागांना राज्याच्या इतर भागांच्या बरोबरीने आणलेले आहे. राज्यात अजून २ लाख १० हजार जोडण्या द्यावयाच्या असून त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
(विशेष प्रतिनिधी)
>अभियंत्यांना अधिकार
इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.