एक्स्प्रेस-वेवर अपघातात १७ ठार
By admin | Published: June 6, 2016 03:44 AM2016-06-06T03:44:31+5:302016-06-06T03:44:31+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे खासगी ट्रॅव्हल्सची बस दोन मोटारींना धडक देत, रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार झाले.
पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे पनवेलजवळील भाताण व शिवकर या गावांजवळ खासगी ट्रॅव्हल्सची बस दोन मोटारींना धडक देत, रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, नऊ महिला व दोन लहान मुलींचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
रविवारी पहाटे एक्स्प्रेस-वेवर गाडीचा टायर फुटल्याने एक स्विफ्ट कार उजव्या लेनमध्ये उभी होती. त्यातील प्रवासी मदतीसाठी हात करत असल्याने, लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन करून परतणाऱ्या इनोव्हा कारमधील प्रवाशांनी गाडी डावीकडील लेनमध्ये लावली. ते मदत करत असताना साताऱ्यावरून मुंबईकडे येणाऱ्या निखिल ट्रॅव्हल्सची बस वेगात आली. समोर स्विफ्ट कार व प्रवासी पाहताच बसच्या चालकाने धडक टाळण्यासाठी बस डावीकडे वळवली, पण बस वेगात असल्याने ती स्विफ्टला धडकलीच, शिवाय पुढे जाऊन इनोव्हालाही धडक देत, रस्त्यालगतच्या २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात बसमधील ११ जण जागीच ठार झाले. सर्व मृत प्रवासी बसमधील आहेत.
एकनाथ शिंदेंकडून विचारपूस
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ
शिंदे यांनी एमजीएम रुग्णालय, पनवेल ग्रामीण रुग्णालय आणि पॅनाशिया रुग्णालयांना भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मृतांची नावे
अनन्या कल्याण कदम (३.५) ठाणे, वेदिका नीलेश यादव (२) सातारा, श्रद्धा दत्तात्रेय काळे (२०) कांदिवली, अविनाश हनुमंत कारंडे (३९) भांडुप, विलास बाबुराव माने (६२) नेरुळ, चतुरा शिवाजी कदम (४३) ठाणे, प्रियांका कल्याण कदम (२२), काशिनाथ सखाराम निकम (४५) सातारा, इकबाल बाबमलाल शेख (६६) सातारा. जयश्री उत्तम गाडे (५0), वैजयंती मनोहर गुजर (४0) मुंबई, संदीप यशवंत शिवरकर (३४) सातारा, संदीप विठ्ठल चव्हाण (२२) ठाणे, ऋतिका प्रकाश गायकवाड (११) ठाणे, कविता प्रकाश गायकवाड (३४) ठाणे, पद्मा महेशकुमार बदल्वा (४५) गोरेगाव, चंद्रभागा बाळकृष्ण चव्हाण (५0 ) कांदिवली.
>>अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट गाडीला दोन वेगवेगळे क्रमांक असल्याचे समोर आले आहे. पुढील बाजूस एमएच 0२ सीएल १४८0 तर मागील बाजूस एमएच 0४ सीएल १४८0 हा क्र मांक आहे. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याचा संशय आहे.