सह विक्रीकर आयुक्ताने घेतली २० लाखांची लाच
By admin | Published: May 11, 2015 04:26 AM2015-05-11T04:26:53+5:302015-05-11T04:26:53+5:30
२० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबईतील सह विक्रीकर आयुक्त रामदास शिंदे यांच्यावर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
अलिबाग : बनावट दस्ताऐवज बनवून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांच्या दंडाची भीती दाखवून २० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबईतील सह विक्रीकर आयुक्त रामदास शिंदे यांच्यावर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांचा हस्तक इरफान भोपाळी हा सुध्दा त्यांच्या जाळ्यात अडकला आहे.
रायगडच्या काळ्या इतिहासात एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागून ती स्वीकारण्याची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपपोलीस अधीक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली.
तक्रारदार हे पनवेलसह इतर शहरांमध्ये बांधकामाचा व्यवसाय करतात. त्यांच्याच कंपनीच्या सीएच्या कार्यालयात इरफान भोपाळी हा काम करतो. विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सी.व्ही. ताठरे यांच्या सहीने तक्रारदार यांच्या कंपनीला १८ मार्च २०१५ फॉर्म ६०३ ची नोटीस काढली. त्यामध्ये सन २००६ ते २००८ या कालावधीमध्ये केलेल्या कामांचे कागदपत्र दाखल करण्याबाबतची नोटीस ३० मार्च २०१५ रोजी तक्रारदार यांच्या कंपनीला प्राप्त झाली. त्यावेळी तक्रारदार यांनी इरफान भोपाळीला नोटीस दाखवून खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी इरफानने ताठरे यांची भेट घेतली असता त्यांनी चार ते पाच कोटी रुपयांचा दंड लागणार असून तडजोड करावयाची असल्यास दीड कोटी रुपये द्यावे लागतील, असा निरोप तक्रारदार यांना इरफानमार्फत दिला.
तक्रारदार यांना इरफानचा संशय आला. त्यांनी त्यांचे भागीदार यांना इरफानसह रामदास शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार ६ मे २०१५ रोजी त्यांनी शिंदे यांची माझगाव येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनीच सदरची नोटीस ताठरे यांच्या नावाने काढल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी कंपनीला चार कोटी ९५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. ६० लाख रुपये दिल्यास नोटीस रद्द करु, असे शिंदे यांनी सांगून लाचेची मागणी केली. त्याचवेळी तक्रारदार यांचे भागीदार यांनी सदरचे सर्व संभाषण टेप केले.
याबाबतची तक्रार आणि संभाषणाची सीडी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानुसार ९ मे २०१५ रोजी इरफान याच्या घरी दुपारी पावणेबारा वाजता रामदास शिंदे यांच्याकडे पडताळणी केली असता २५ लाख रुपयांवर तोड झाली. त्यानंतर १० मे २०१५ रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रामदास शिंदे यांच्या वतीने इरफान याने तक्रारदार यांच्या पनवेल येथील रॉयल बियर शॉपी येथे तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या २५ लाख रुपयांपैकी २० लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. दरम्यान, शिंदे यांच्या मालमत्तेची कसून चौकशी सुरू असून मोठ्या प्रमाणात घबाड सापडण्याची शक्यता असल्याचे कलगुटकर यांनी सांगितले.
> शिंदे याच्याकडे सापडले बेहिशेबी मालमत्तेचे घबाड
> लाचखोर सह विक्रीकर आयुक्त रामदास शिंदे यांच्याकडे सापडले बेहिशेबी मालमत्तेचे घबाड
> वरळीतील शीतल बिल्डींगमधील फ्लॅट नंबर ६०२ वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापा टाकण्यात आला. यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली.
> महालक्ष्मी कंस्ट्रक्शनमध्ये भागिदारी, २० टक्के हिस्सा
> पनवेलमध्ये ३३६०.० चौ. मी. भूखंड विकसित करण्यासाठी ६,४६,५५,००० रुपयांना खरेदी केला.
> अहमदनगर जिल्हात विविध ठिकाणी किमान ६ हेक्टर शेतजमीन
> स्वत:च्या आणि कुुटुंबियांच्या पाच विमा पॉलिसी
> भाडेतत्त्वावर दिलेले तीन मालकीचे गाळे
> स्वाती शिंदे (पत्नी) हिच्या नावावर २ अकाऊंट
> पाथर्डी येथे जमीन
> खारघर येथे रो हाऊस
> पनवेल शहरात लाखोंचे व्यापारी गाळे,
> एलआयसी व म्युचल फंड
> ३४ लाखांचे सोनं चांदी, पीपीएफमध्ये मोठी गुंतवणूक
फाईलसाठी वरिष्ठांची ओळख
तक्रारदार यांनी मुदतीमध्ये ताठरे यांची भेट घेतली. त्यावेळी सदरच्या नोटीसमध्ये शिक्का आपलाच असून सही आपली नसल्याचे ताठरे यांनी तक्रारदार यांना सांगितले. नोटीसमध्ये देण्यात आलेला फॉरमॅट तीन वर्षांपूर्वी बंद झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यावेळी इरफानने ताठरे यांचे वरिष्ठ सहआयुक्त रामदास शिंदे यांच्याशी ओळख असल्याचे सांगून त्यांच्याकडे फाईल मागवून घेतो, असे तक्रारदार यांना इरफानने सांगितले.