ऑनलाइन लोकमतकोपरगाव, दि. : देशात सर्वाधिक नागरीकरण झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे २०१७ पर्यंत राज्यातील सगळी शहरे हागणदारीमुक्त करणार असल्याचे सांगत काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन निर्णायक लढाई सुरू केली आहे. देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ५० दिवस त्रास सहन करून त्याचं मोल जनतेने द्यावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गुरूवारी कोपरगाव येथे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शहरांमध्ये शौचालये नसल्याने ५० टक्के भारतीयांना आजही उघड्यावर जावे लागते. आपण स्वच्छ भारत अभियानात देशातून निवडलेल्या १० शहरांमधील ५ महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील ३०० पैकी ५२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकार निधी द्यायला तयार आहे. झोपडपट्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत स्वत:चे घर मिळणार आहे. राज्यात २ लाख घरांचे प्रस्ताव मंजूर केले, असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.