‘सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू होणं हे सरकार अस्तित्वात नसल्याचं लक्षण’, संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:18 PM2023-10-03T12:18:53+5:302023-10-03T12:19:26+5:30
Sanjay Raut Criticize State Government: नांदेडमधील सरकारी रुग्णालयात २४ तासांच २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेत त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
नांदेडमधील सरकारी रुग्णालयात २४ तासांच २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेत त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. नांदेड सारख्या ठिकाणी, सरकारी रुग्णालयात २४ तासात २४ रुग्ण मृत्यू होतात, याचा अर्थ सरकार अस्तित्वातच नाही असा होतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही पहिली घटना नाहीये, या आधी देखील ठाण्यातील कळव्याच्या पालिका रुग्णालयात देखील असा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. कळव्यातील प्रकरणानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की, ठाण्यामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचं टाळलं होतं, असेही ते पुढे म्हणाले.
राज्यात औषधांचा तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचा व्यवहार, परदेश दौरा, माणसे फोडण्यात यातच रस उरलेला आहे. थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा ताबडतोब घेतला. राज्य सरकारमधील आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात, असा आरोपही त्यांनी केला.