रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:59 PM2023-10-10T15:59:43+5:302023-10-10T16:00:51+5:30
याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
मुंबई : रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची ३१ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम हडप केल्याप्रकरणी सीबीआयने पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईतील दोघांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाचा माजी व्यवस्थापक विवेक कुमार, बँक ऑफ बडोदाचा माजी शाखा व्यवस्थापक जसवंत राय, दिल्लीस्थित मध्यस्थ गोपाल ठाकूर, मुंबईतील मध्यस्थ हितेश करेलिया आणि नीलेश भट यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
१२ ठिकाणी सीबीआयचे छापे
- याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. उपलब्ध माहितीनुसार, रेल्वे जमीन विकास प्राधीकरणाने बँक ऑफ बडोदाच्या दिल्ली येथील शाखेमध्ये ३५ कोटी रुपये एक वर्षासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवले होते.
- एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आणखी तीन महिन्यांसाठी या मुदतठेवीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- या प्रक्रियेत सहभागी असलेल्या आणि आता आरोपी असलेल्या या पाचही जणांनी संगनमताने या रकमेतील ३१ कोटी ५० लाख रुपये काढून घेतले व केवळ साडे तीन कोटी रुपये आगामी तीन महिन्यांसाठी गुंतवले.
- या पैशांची फिरवाफिरवी करण्याकरिता मुंबईत काही बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपन्यांत हे पैसे जमा केल्यानंतर तेथून ते रोखीने काढत आरोपींनी हे पैसे वाटून घेतल्याचा आरोप आहे.