जिरायती भागाला रोज ४ लाख लिटर पाणी
By Admin | Published: May 19, 2016 01:58 AM2016-05-19T01:58:56+5:302016-05-19T01:58:56+5:30
तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
बारामती : तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णत: संपल्याने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने जिरायती भागातील जवळपास ४० गावांना दररोज १० हजार लिटर याप्रमाणे प्रतिदिन ४ लाख
लिटर पाणी पुरविण्यास ५ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील नागरिकांच्या पाण्याची गरज भागवून पिण्यासाठीचे शुद्ध पाणी जिरायती भागाला पुरविले जात आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत पत्र दिले होते. जिरायतभागात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषदेने लक्ष देण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. जिरायत भागातील पाण्याची भयंकर
स्थिती लक्षात घेऊन जगताप यांनी शहरात होणारा पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन याबाबत मुख्याधिकारी
नीलेश देशमुख व संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार शहराची पाण्याची गरज भागवून जवळपास प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी देणो शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून जवळपास १० गावांना दररोज १० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.
बारामती शहरात ४० दिवस पाणी पुरेल इतके पाणी साठविण्यासाठी दोन तलाव उपलब्ध झाले आहेत. सद्य:स्थितीत हे तलाव भरलेले आहेत. येणाऱ्या १ जूनला धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने उपलब्ध पाण्यात शहराची गरज भागवून जिरायत भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले आहे. जिरायतभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या वतीने अवचट इस्टेट येथील वॉटर स्टँड पोस्ट येथून पाण्याचे टँकर पाठविले जातात. या ठिकाणी आज नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यासह सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पाणीपुरवठा सभापती
शैलेश बगाडे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, सतीश तावरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र खराडे, संभाजी माने, महादेव सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली.
(वार्ताहर)
नियोजनामुळे बारामती शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन साठवण तलाव उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या प्रशासनाच्या सहकार्याने जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले. जिरायतभागाला पाणीपुरवठा करताना शहरात कोणतीही पाणीकपात केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.