राज्यभरात काँग्रेसच्या ५० जनसंघर्ष सभा, आज दौलताबादेतून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:16 AM2019-02-07T06:16:40+5:302019-02-07T06:17:15+5:30
जनसंघर्ष यात्रेनंतर आता काँग्रेस राज्यभर जनसंघर्ष सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ५० जनसंघर्ष सभा घेण्याची घोषणा पक्षाने केली असून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे गुरुवारी पहिली सभा होईल
मुंबई : जनसंघर्ष यात्रेनंतर आता काँग्रेस राज्यभर जनसंघर्ष सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ५० जनसंघर्ष सभा घेण्याची घोषणा पक्षाने केली असून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे गुरुवारी पहिली सभा होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, केंद्रातील व राज्यातील नाकर्त्या व लोकविरोधी भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यभरात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेच्या माध्यमातून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून १२० विधानसभा मतदारसंघांत जाहीर सभा घेण्यात आल्या. सरकारविरोधातील संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी राज्यभरातील विविध शहरांमध्ये ५० जनसंघर्ष सभा घेण्यात येतील.
या सभांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा व अपयशाचा पंचनामा केला जाईल. राज्यातील सर्व प्रमुख नेते व काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभांना संबोधित करतील, असेही चव्हाण म्हणाले.
आज दुपारी २.०० वाजता दौलताबाद येथे पहिली सभा होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबाद शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवारी सकाळी १० वाजता पैठण येथे तसेच सायंकाळी ५.३० वाजता पुणे शहरात जनसंघर्ष सभा आयोजित करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.