जिल्ह्यात दरमहा ५००० लिटर गोमूत्र अर्क निर्मिती
By Admin | Published: April 3, 2015 11:14 PM2015-04-03T23:14:41+5:302015-04-04T00:09:19+5:30
अभिनव उपक्रम : भाकड गार्इंपासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
नरेंद्र रानडे - सांगली -भाकड गाई कत्तलखान्याकडे जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील पंधरा गोप्रेमी स्वतंत्ररित्या मागील दीड वर्षापासून एक उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे याला धार्मिकतेचे वलय नसून वैज्ञानिकतेचा आधार आहे. गोमूत्राचे औषधी गुण लक्षात घेऊन शेतकऱ्यांकडून गोमूत्र खरेदी करून त्यापासून गोमूत्र अर्क तयार करण्यात येत आहे. आज महिन्याला जिल्ह्यात पंंधरा हजार लिटर गोमूत्र संकलित होत असून त्यापासून पाच हजार लिटर गोमूत्र अर्काची निर्मिती होत आहे. त्याचप्रमाणे गाईच्या अन्य घटकांपासूनही होणारे विविध लाभ शेतकऱ्यांना पटवून देऊन त्यांनाही नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतीचा आधार काही प्रमाणात गोवंश हाच आहे. शेतकरी देशी गाय पाळण्यास प्राधान्य देतो. परंतु भाकड गाई सांभाळणे हे कित्येकांना शक्य होत नाही. परिणामी त्या गाई कत्तलखान्याकडे रवाना करण्यात येतात. तथापि गाईचा अखेरपर्यंत उपयोग होतो, हे संशोधनातून सिध्द झाले आहे. केंद्र शासनाच्या मान्यतेने ‘पंचगव्य थेरपी’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून गाईचे महत्त्व कसे आहे त्याचा अभ्यास करण्यात येतो. तामिळनाडू, गडचिरोली येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधितांना दोन वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करावे लागते. यानंतर त्यांना ‘गव्यसिध्द’ ही पदवी प्राप्त होते. जिल्ह्यातील सव्वाशे जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यातील पंधरा ते वीस जणांनी गोमूत्र अर्क निर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे. तेथे महिन्याला सुमारे पंधरा हजार लिटर गोमूत्र संकलित करण्यात येते व त्यावर प्रक्रिया करून गोमूत्र अर्क तयार केला जातो. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून वीस रुपये लिटर या दराने गोमूत्र खरेदी करण्यात येते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमात शिकविल्याप्रमाणे विविध उपपदार्थही तयार केले जातात. प्रयोगशाळेत चाचणी करुन गाईपासून निर्मिती होणाऱ्या पदार्थांमध्ये कोणते घटक किती प्रमाणात मिसळावेत, याचे प्रमाण निश्चित केलेले आहे. शेणापासून निर्मित दंतमंजनालाही मागणी वाढत आहे. आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठीच राबलेल्या गाई भाकड झाल्या म्हणून कत्तलखान्यात विकू नयेत, तर त्यांचे गोमूत्र, शेण आदींपासून आर्थिक लाभ करून घ्यावा, असे आवाहनही कृतिशील गोप्रेमींनी केले आहे.
शेतकऱ्यांनी धार्मिकतेच्या बंधनात अडकून उपयोग नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गाईकडे एक उपयुक्त पशू म्हणून पाहिले आहे. आपणदेखील वैज्ञानिकतेचा आधार घेत गाईपासून आर्थिक लाभ कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे.
- अंकुश गोडसे, अध्यक्ष,
गोविज्ञान व गोसंवर्धन संस्था सांगली.
गोमूत्र, शेण याचे उपयोग शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजेत. आज समाजातून गोमूत्र अर्काला वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोमूत्र अर्क निर्मितीला प्राधान्य देण्याबरोबरच गाईच्या पंचगव्यापासून निर्मित उपपदार्थ निर्मितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
- गव्यसिध्द डॉ. नीतेश ओझा,
सांगली.
गोमूत्र अर्क निर्मिती व उपयोग
गाईने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी दिलेले गोमूत्र शेतकऱ्यांकडून गोळा केले जाते. ते उच्च तापमानाला उकळले जाते. त्यानंतर त्यापासून निर्मित बाष्पावर प्रक्रिया करुन पुन्हा गोमूत्रात रूपांतर केले जाते. यालाच गोमूत्र अर्क म्हणतात. हे कित्येक वर्षे टिकते. साधारणत: पंधरा हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केल्यावर पाच हजार लिटर गोमूत्र अर्क तयार होतो.
जिल्ह्यात गोमूत्र अर्कास दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. नियमितपणे गोमूत्र अर्क घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते असे ‘गव्यसिध्द’ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. प्रामुख्याने लठ्ठपणा कमी करणे, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, कर्करोग आदी रोगांपासून बरे होण्यासाठी गोमूत्र सेवन करण्याकडे काही नागरिकांचा कल आहे.