राज्यात दस्त नोंदणी ५० हजार कोटींची, मार्चमध्ये साडेसात हजार कोटी झाले जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:39 AM2024-04-01T07:39:54+5:302024-04-01T07:40:29+5:30
Maharashtra News: जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे.
पुणे - जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. गेल्या ११ महिन्यांत दस्त नोंदणीतून ४२ हजार ३५८ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला होता, तर एकट्या मार्च महिन्यात दस्त नोंदणीतून ८ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिली.
राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी विभागाला ४५ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर, घर खरेदीला मिळणारा प्रतिसाद बघता वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उद्दिष्ट ५० हजार कोटी रुपयांचे केले.
त्यानुसार, एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांमध्ये राज्यात २५ लाख २४ हजार २६८ दस्त नोंदणीतून ४२ हजार ३५८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. एकूण उद्दिष्टाच्या हे प्रमाण ८४.७२ टक्के इतके होते. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी मार्च महिन्यात विभागाला सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा महसूल येणे अपेक्षित होता. विभागाने हे ८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्टही ३१ मार्च अखेर साध्य केले आहे. ३१ मार्च रोजी २५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
महिना महसूल (कोटींत)
एप्रिल २८७५.८०
मे ३४३९.६२
जून ३८०४.६९
जुलै ३९२१.६३
ऑगस्ट ४०५६.४६
सप्टेंबर ४३७६.९६
ऑक्टोबर ३७९७.६१
नोव्हेंबर ३७३१.७८
डिसेंबर ३९८२.२२
जानेवारी ४१५६.४७
फेब्रुवारी ४२१५.१८
मार्च (सुमारे) ७६४२
एकूण (सुमारे) ५०,०००