नांदेड महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान, आज निकाल; ‘व्हीव्हीपॅट’मध्ये अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:36 AM2017-10-12T03:36:11+5:302017-10-12T03:36:19+5:30
नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते.
नांदेड: नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. काँग्रेस आणि भाजपामध्ये येथे मुख्य लढत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी निकाल अपेक्षित आहेत.
सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १६ टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत केवळ ४५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५च्या सुमारास बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होणाºया मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी सांगितले.
१७पैकी १२ मशीन सुरू
राज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या प्रयोगात ३७पैकी तब्बल १७ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. दीड-दोन तासांनंतर त्यातील १२ मशीन सुरू झाली. चार ठिकाणी व्हीव्हीपॅट काढून ईव्हीएम मशीनवरच मतदान घेण्यात आले. व्हीव्हीपॅट मशिनवरील मतदानाची टक्केवारी मोजण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव शेखर चन्ने हे नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.