महाड शहरात ६२६ चिमण्यांची नोंद
By admin | Published: April 4, 2017 03:49 AM2017-04-04T03:49:11+5:302017-04-04T03:49:11+5:30
सिस्केप या संस्थेतर्फे १ एप्रिल रोजी महाड शहरातील चिमण्यांच्या गणतीचा कार्यक्रम हाती घेतला होता
महाड : गिधाड संवर्धनाच्या कामामध्ये संपूर्ण जगभरात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सिस्केप या संस्थेतर्फे १ एप्रिल रोजी महाड शहरातील चिमण्यांच्या गणतीचा कार्यक्रम हाती घेतला होता. या पाहणीत चिमण्यांच्या संख्येमध्ये होणारी घट ही गंभीर बाब असल्याचे मत पक्षिमित्र प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले. महाड शहरात ६२६ पर्यंत चिमण्या असल्याची नोंद करण्यात आली. येथील चिमण्यांची संख्या वाढवणे सहज शक्य आहे, मात्र यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेस्त्री यांनी केले आहे.
जागतिक स्तरावर चिमणी या पक्ष्याची दखल घेतली जाते. २० मार्च हा जागतिक चिमणी दिन अनेक देशात पाळला जातो. या दिवशी सर्वत्र चिमण्यांची घरटी तयार करून ठिकठिकाणी ठेवली जातात. साधारणपणे उन्हाळ्यात या चिमण्यांच्या विणीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे या काळात त्यांची घरटी बनवण्याची खूप धडपड सुरू असते. मात्र दुर्दैवाने शहरांच्या ठिकाणी त्यांना योग्य जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच शहराच्या ठिकाणी चिमण्यांचा वावर कमी प्रमाणात असल्याचे पक्षिमित्रांनी केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट होत आहे. मोजण्यात आलेल्या चिमण्यांची संख्या महाड शहरात ६२६ पर्यंत असल्याची नोंद या पक्षिमित्रांना आढळून आली. सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, विक्रांत खुळे, ओमकार माने, सुयश नांदगावकर, श्रध्दा जोशी, माधव डाकणे, अविनाश घोलप, मंदार कदम, सपना शेठ, अमोल वारेगे, चिंतन वैष्णव आदींनी या गणतीत सहभाग घेतला. (वार्ताहर)