मुंबई : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार असून, या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६० ते ६५ हजार कोटींची गुंतवणूक येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात येत असते. महाराष्ट्रदेखील यात प्रतिनिधित्व आहे. १५ ते १९ जानेवारीदरम्यान ही बैठक पार पडेल. गेल्या वेळी ३० हजार २७२ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी झाले होते. मात्र, या वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे ६५ हजार कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी करण्यात येणार आहेत. यातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार येतील. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्याला २५ कोटींचा खर्च येणार आहे.
राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक• राज्यात शिदे-फडणवीस सरकार आल्यानंतर १ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. हिंदुजाच्या माध्यमातून ३५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.• यापैकी ४० टक्के गुंतवणूक विदर्भात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील. • चंद्रपूर येथे ट्रायबल इंडस्ट्री पार्क, भंडारा येथे कॉपर पार्क उभारण्यात येईल. विदर्भातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसायाला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.