६७ परीक्षांच्या तारखा जाहीर, २३ मार्चपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:58 AM2018-03-10T03:58:31+5:302018-03-10T03:58:31+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल.
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उशिरा का होईना, अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या वेळापत्रकानुसार टीवायबीए जर्मन स्टडीजची २३ मार्चला पहिली परीक्षा सुरू होईल.
या आधी मार्च महिना उलटला, तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधूनही रोष व्यक्त होऊ लागला होता. अखेर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शुक्रवारी एकूण ६७ परीक्षांच्या तारख्या जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी हिवाळी परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. विधि अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. याच निकालांच्या गडबडीत प्रशासनाने उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर लागल्याची माहिती आहे.
दरम्यान, परीक्षा सुरू होण्याच्या तारखा प्रशासनाने जाहीर केल्या असल्या, तरी त्यांचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
वेळापत्रक खालीलप्रमाणे...
अभ्यासक्रम तारीख
टीवायबीए जर्मन स्टडीज २३ मार्च
टीवायबीए इंट्रीग्रेटड स्टडीज २६ मार्च
एमए इन इंग्रजी ३ एप्रिल
एलएलएम (पहिले सत्र) ११ एप्रिल
टीवायबीए (सहावे सत्र) १२ एप्रिल
एम. ए. (पहिले सत्र) १८ एप्रिल
टीवायबीए (पाचवे सत्र) २६ एप्रिल
यंदा परीक्षांसह निकालही वेळेत
परीक्षा वेळेवर सुरू करून, परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी महाविद्यालये व शिक्षकांनी मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे. या वेळी सीएची परीक्षा २ मे ते १७ मे या दरम्यान असल्याने, या कालावधीत परीक्षा न ठेवण्याची काळजीही घेण्यात आलेली आहे.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक-परीक्षा व मूल्यमापन मंडळ