Video: ७ किमी वाहनांच्या रांगा, FasTag नसल्यानं डबल वसुली; किणी टोल नाक्यावर मनसे नेत्याचा राडा
By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 12:11 PM2021-02-17T12:11:37+5:302021-02-17T12:17:51+5:30
MNS Agitation on Toll Naka for traffic jam due to collection double charge from car owner: मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना, त्यांना अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसला.
कोल्हापूर – फास्टटॅगसाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं, त्यामुळे १५ तारखेपासून ज्यांच्याकडे फास्टटॅग नाही अशा वाहनांना दुप्पट टोल भरावा लागत आहेत. अशातच अनेक ठिकाणी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तांत्रिक अडचणींमुळे फास्टटॅग असूनही टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होतेय, त्यातच दुप्पट टोल आकारणीमुळे आता टोल नाक्यावर गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे.(MNS Rupali Patil Thomabre Aggressive at Kini Toll Naka over traffic jam due to Fastag System)
मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना, त्यांना अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसला. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर रूपाली पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला, जवळपास ७ किमी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत वाहनं टोल न घेता सोडण्यास सांगितली. फास्टटॅग असूनही लोकांना रांगेत राहावं लागत असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याबाबत मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, किणी टोल नाक्यावर फास्टटॅगवरून लोकांची पिळवणूक थांबवली पाहिजे, फास्टटॅग ही लोकांना सुविधा देण्यासाठी आहे की मारायला? जवळपास ७ किमी वाहनांच्या रांगा आहेत, त्यात रुग्णवाहिका अडकून लोकांचे जीव जातील. पहिल्यांदा टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा बंद करा अन्यथा मनसेला याबाबत आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
नॅशनल हायवेचा वापर करणाऱ्यांना फास्टटॅग बंधनकारक
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टटॅग बंधनकारक केलं आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी याआधी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारीमध्ये रात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून Fast Tag प्रणाली वाहनधारकांना अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टटॅग यंत्रणा बसविण्यात आली.
किणी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी
किणी येथील टोल नाक्यावरील आठ लेनपैकी सहा लेन फास्टटॅगसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला एक एक लेन फास्टटॅग नसणाऱ्या वाहनधारकांसाठी ठेवण्यात आली. मात्र,१५ फेब्रुवारीपासून दुप्पट टोल भरावा लागत आहे. यामुळे वादावादी होत असल्याने वाहतूक खोळंबून राहत आहे, तर टोल नाक्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लांबपर्यंत पोहचतात. टोल कर्मचारी व वाहनधारकांच्यात वारंवार वादावादी सुरू राहिल्याने पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर टोल नाक्याजवळ फास्टटॅग बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर वाहनधारक थांबवून चौकशी करून बसवून घेत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत होते.