सासवड : पुरंदर तालुक्याची दुष्काळी तालुका ही प्रतिमा पुसून त्याचा विकास व्हावा या हेतूने येथील शेतकरी अनंता महादेव कुंभारकर यांनी त्यांची साडे आठ एकर जमीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची तयारी दर्शवली आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, वाघापूर, पारगाव, एखतपूर, खानवडी - मुंजवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर तालुक्यातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र ज्या भागात हे होण्याचे संकेत दिले, त्या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मात्र यास तीव्र विरोध केला आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. खानवडी-पारगाव रस्त्याला लागूनच जमीन असून शेतजमीन गट क्रमांक २०२, २०३, २०५ मधील जमीन देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्वत: सेवानिवृत्त एसटी बस चालक असून, ते चांगल्या दर्जाची शेती करतात. याविषयी सांगताना अनंता कुंभारकर म्हणाले, की पुरंदर तालुक्यातील अनेक पिढ्यांनी खूप दुष्काळ सोसला आणि अनुभवला आहे. जगात एकीकडे क्रांती होत असताना पुरंदर तालुका अजूनही पुरेशा पाण्यापासून वंचित आहे. तालुक्यात कारखानदारी नाही, मोठे उद्योग नाहीत. पूर्व भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असून, यामुळे तालुक्याची भरभराट होऊन दुष्काळी ही ओळख पुसण्यास मोठी मदत होणार आहे. आणि म्हणूनच मी यासाठी शेतजमीन देण्यास तयार आहे.
विमानतळाला देणार ८ एकर
By admin | Published: November 03, 2016 1:24 AM