राज्यातील ९५ टक्के उद्योग पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:48 AM2020-08-13T03:48:01+5:302020-08-13T03:48:13+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.
मुंबई : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यातील ९५ टक्के तर मुंबई महानगर विकास क्षेत्रातील ८२ टक्के उद्योग पुन्हा सुरू झाले असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील अत्यावश्यक सेवांचे उत्पादन व निरंतर प्रक्रिया घटकांना लॉकडाऊनमधून सूट दिली होती. दुसऱ्या ते पाचव्या टप्प्यात एमआयडीसी क्षेत्रातील ६० ते ६५ टक्के उद्योगांनी परवानगी मिळवून आपले उत्पादन सुरू केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील विजेचा वापर लक्षात घेता मुंबई महानगरातील ८२ टक्के तर राज्यातील ९५ टक्के उद्योग सुरू झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (वा.प्र.)