राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आरेवाडीतील गजनृत्याला पसंती

By admin | Published: March 1, 2017 02:37 AM2017-03-01T02:37:29+5:302017-03-01T02:37:29+5:30

राज्यातील लोककलांमध्ये धनगरी गजनृत्याला मानाचे स्थान आहे.

Aarevadi gajranitri likes in national cultural festivals | राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आरेवाडीतील गजनृत्याला पसंती

राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आरेवाडीतील गजनृत्याला पसंती

Next

नामदेव मोरे,
नवी मुंबई- राज्यातील लोककलांमध्ये धनगरी गजनृत्याला मानाचे स्थान आहे. अनेक लोककला लोप पावत असताना सांगली जिल्ह्यातील आरेवाडी ग्रामस्थांनी गजनृत्याची प्राणपणाने जपणूक केली आहे. येथील कलाकार देश-विदेशात जाऊन कलेचे सादरीकरण करत आहेत. या कलाकारांनी गुजरातमधील सांस्कृतिक महोत्सवामध्ये उपस्थितांची मने जिंकल्यानंतर आता १ ते ६ मार्चला कर्नाटकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील ज्या कलाकारांनी परंपरागत कला प्राणपणाने जपली त्यामध्ये धनगरी गजनृत्याचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी गावातील कलाकारांनी ही कला जपली व सातासमुद्रापार विदेशातही पोहोचविली आहे. या पथकाला नुकतेच गुजरातमधील सांस्कृतिक महोत्सवामध्ये आमंत्रित करण्यात आले होते.
चार राज्यांतील कलाकारांनी त्यांच्या कला सादर केल्या. यामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली ती गजनृत्याला. अंगात शर्ट, जॅकेट, पायात इजार, कंबरेला घागरा, डोक्याला फेटा आणि हातात रंगीबेरंगी रुमाल घेतलेले कलाकार, ढोल, कैताळ (कैचाळ) व बासरी व पायातील घुंगराच्या तालबद्ध आवाजामध्ये सादर केलेल्या गजनृत्याने महाराष्ट्रातीलच नाही तर भारतीय संस्कृतीचे वैभव किती मोठे आहे याची प्रचिती उपस्थितांना दिली. गुजरात दौऱ्यानंतर या कलाकारांनी दोन दिवस पुणे येथे कला सादर केली. यानंतर १ ते ६ मार्चदरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या भारतीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये कलेचे सादरीकरण करणार आहेत.
आरेवाडीतील ग्रामस्थांनी यापूर्वीही देश-विदेशात कला सादर करून या कलेचा व देशाचा बहुमान वाढविला आहे. यामध्ये १९५८मध्ये राजधानी दिल्ली दौऱ्यालाही विशेष महत्त्व आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलाकारांचे कौतुक केले होते. २००१मध्ये कलाकारांनी इंग्लंड दौरा केला व गोऱ्या साहेबांची मनेही जिंकली. रशियातील भारत महोत्सव २००९मध्ये मॉस्कोमध्ये धनगरी गजनृत्याच्या ठेक्यावर भारतीयांसह रशियन नागरिकांना फेर धरण्यास भाग पाडले होत. दिल्लीमध्ये २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटनामध्ये ४८ कलाकारांनी हे नृत्य सादर करून आपली लोककला संपूर्ण विश्वभर पोहोचविली. दिल्ली, पणजी, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, भोपाळ, पुणे, नागपूर ते कन्याकुमारीपर्यंत कलेचा प्रचार व प्रसार सुरू आहे. बिरोबाच्या भक्तांकडून सुरू असलेल्या कलेच्या उपासनेमुळे देश-विदेशात लोककलांचा सन्मान वाढत आहे.
>नृत्याचे स्वरूप
धनगरी गजनृत्याचे अभ्यासक दाजी कोळेकर यांनी या कलेविषयी माहिती देताना सांगितले की, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कलेला कैपत नृत्य असेही म्हटले जाते. कैलासपती भगवान शंकराचा अवतार असलेल्या श्री बिरोबाच्या आराधनेतून या नृत्याची निर्मिती झाली. पूर्वी डोंगर, दऱ्यांमध्ये रानावनात मेंढपाळ म्हणून व्यवसाय करणारे धनगर बांधव रात्री बिरोबाची आराधना करण्यासाठी हे नृत्य सादर करत. ढोलाच्या तालावर सादर केल्या जाणाऱ्या गजनृत्याचे अनेक प्रकार आहेत. काही जुने प्रकार नामशेष झाले असले तरी जवळपास ८ ते १० प्रकार कलाकारांनी अद्याप जतन केले आहेत. प्रत्येक प्रकारामध्ये १५ ते २० उपप्रकार (पावंड) आहेत. यामध्ये नृत्य सादर करणारे ८ ते २० कलाकार असतात. अनेक प्रकार हत्तीसारखे डोलून सादर केले जात असल्याने कैपत नृत्याला गजनृत्य असेही संबोधले जात आहे.
>आरेवाडी गावाचे वैशिष्ट्य असलेली गजनृत्य कला पिढीजात परंपरा असल्याने टिकून आहे. जुन्या कलाकारांची कला जतनासाठी एक तपश्चर्या असायची. शेळ्या-मेंढ्या राखताना नेहमी सराव करायचा. त्या तुलनेत नव्या पिढीतील कलाकार सरावामध्ये कमी पडत आहेत. त्यासाठी त्यांना जुन्या-जाणत्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, तरच ही लोककला जतन होईल.
- संजय कोळेकर,
इंग्लंड दौऱ्यातील कलाकार, नवी मुंबई
>आम्ही सध्या ही लोककला मुंबईमध्ये जिवंत ठेवत असून आमच्या पूर्वजांकडून ती शिकायला मिळाली आहे. विविध सण समारंभाप्रसंगी आम्ही आमच्या आरेवाडी गावी जाऊन ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन घेतो. मुंबईमध्ये शिक्षण घेत ही कला जोपासताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे जुन्या कलाकारांसारखी गुणवत्ता सिद्ध करता येत नाही; परंतु आम्ही कसोशीने प्रयत्न करून जुन्या कला प्रकाराची माहिती घेत असतो.
- अनिल कोळेकर, अध्यक्ष नवयुवक गजनृत्य मंडळ, मुंबई

Web Title: Aarevadi gajranitri likes in national cultural festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.