मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सोमवारपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात आहे. तर महाराष्ट्रात CAA लागू होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात घोषणा करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.
आझमी यावेळी म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आश्वासन दिले होते की, नागरिकत्व कायद्यामुळे कुणालाही त्रास होऊ देणार नाही. त्यामुळे केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालच्या सरकारने ज्याप्रमाणे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात विधानसभेत ठराव मंजूर केला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू होणार नसल्याची मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात घोषणा करावी, अशी मागणी आझमी यांनी केली आहे.
तर संविधानाला मानणारा प्रत्येकजण आज सीएए, एनआरसी आणि एनपीआरला विरोध करत आहे. मात्र भाजप सरकार ही संविधानाच्या विरोधात काम करत आहे. तर देशातील मुस्लिमांना त्रास देण्याचा काम सुद्धा भाजप सरकार करत असल्याचा आरोपीही यावेळी आझमी यांनी केला.