भंगार बाजारावरील कारवाई सलग दुस-या दिवशी,परिसराला छावणीचे स्वरूप
By admin | Published: January 8, 2017 11:44 AM2017-01-08T11:44:04+5:302017-01-08T12:19:39+5:30
पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - नाशिक महापालिका प्रशासनाकडून शहरातील चुंचाळे शिवार आणि अंबड-लिंकरोडवरील वादग्रस्त ठरलेला बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. महापालिकेने शनिवारपासून या कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण हटाव मोहीम आज सकाळी 9 वाजता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकूण 748 गोदामे व दुकाने असून शनिवारी पहिल्या दिवशी 94 दुकाने भुईसपाट करण्यात आली होती.
कडेकोट पोलीस बदोबस्तामुळे आज विरोध करणाऱ्यांचा विरोध काहीसा कमी झाला आहे. काल सकाळी शांततेत कारवाई सुरु असताना दुपारी संजीव नगर भागात काही जणांनी दगडफेक सुरु केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे आज बंदोबस्त वाढविण्यात आला असून ड्रोन कॅमे-याने परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत
तर, न्यायालयासह शासन व राजकीय स्तरावरून बाजार वाचविण्यासाठी सारे प्रयत्न विफल ठरल्यानंतर व्यावसायिकांचा विरोध मावळला आणि अनेकांनी स्वत:हून भंगार माल रात्रीतून अन्यत्र हलविला. महापालिकेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, सुमारे ४० ते ५० एकर परिसरात पसरलेला हा बाजार पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी आणखी काही दिवस मोहीम चालणार आहे.