जोगेश्वरीतील ‘त्या’ गर्दुल्यांवर कारवाई
By admin | Published: November 3, 2016 05:24 AM2016-11-03T05:24:53+5:302016-11-03T05:24:53+5:30
जोगेश्वरीच्या शामनगर झोपडपट्टीत गर्दुल्यांनी विवाहितेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार केला.
मुंबई : जोगेश्वरीच्या शामनगर झोपडपट्टीत गर्दुल्यांनी विवाहितेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार केला. या प्रकारामुळे या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अंबोली पोलिसांनी गर्दुल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
शामनगरमध्ये ठिकठिकाणी गर्दुल्ले आणि चरसी लोक घोळका करून उभे असतात. रात्रीच्या वेळेस या लोकांचा वावर या परिसरात वाढतो. मात्र घाबरुन एकही जण तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. महिला आणि मुलींना पाहून अश्लील हालचाली आणि शेरेबाजी या टोळक्यांकडून केली जाते. ज्यामुळे त्यांची या विभागात दहशत निर्माण झाली असून त्यांच्या विरोधात एकही तक्रार पोलिसांना करण्यात आलेली नाही. ह्यमात्र शामनगरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर या टोळक्यांवर कारवाई करण्यास अंबोली पोलिसांनी सुरुवात केली आहे. जर स्थानिकांना अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर त्यांनी याबाबत अंबोली पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, अंबोली पोलिसांनी अटक केलेल्या आठही आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. आठ पैकी पाच जणांवर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासाठी आरोपी आणि पीडित महिलेचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. तसेच ज्या झोपडीत हा प्रकार घडला त्याला बंद करून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
>पोलिसांनाही मन:स्ताप
चरसी आणि गर्दुल्यांना पकडण्यास पोलिसही पुढाकार घेत नाहीत. कारण एक तर ते शुद्धीत नसतात आणि दुसरे
म्हणजे एखाद्या वेळी त्यांना पोलीस ठाण्यात डांबले तर ते याठिकाणी नैसर्गिक विधी करण्यासही मागे पुढे पाहत नाही, त्यामुळे याचा मन:स्ताप पोलिसांना होतो.
त्यामुळेच त्यांची हिम्मत वाढली असल्याचे शामनगरमधील एका रहिवाशाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच एखादा तक्रार करायला गेला तर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते त्यामुळे या भानगडीत न पडता सरळ दरवाजा बंद करून बसलेले बरे, असेही एकाने सांगितले.