मुंबई : संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडण्याचे काम करतात ते योग्य आहे; पण महापुरुषांवर असे वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्यावर ती कारवाई होईलच; पण स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदींनी भिडेंवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांना आलेल्या धमक्यांबाबत म्हणणे मांडले. यशोमती ठाकूर यांना सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येईल व धमकी देणाऱ्याला जेलमध्ये टाकू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अनेक आमदारांना धमकी आल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलाही धमकीचे फोन व ईमेल आले. मी पोलिस तक्रार केल्यानंतर कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक करून जामिनावर सोडले. यामागे कोणी सूत्रधार आहे का, असा सवाल त्यांनी केला.
‘ते आम्हाला गुरुजी वाटतात...’ - यावेळी फडणवीस यांनी भिडेंचा गुरुजी म्हणून उल्लेख केल्याने काँग्रेस सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. ते आम्हाला गुरुजी वाटतात. काय अडचण आहे? त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे, असे फडणवीस म्हणाले. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात अवमानजनक वक्तव्य केले तर केस फाइल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेतही गोंधळ संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. भाई जगताप यांनी केलेली चर्चेची मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी फेटाळून लावली.
इतिहासात गुंतवून देश, राज्याला मारणे घातकलोकांना इतिहासात गुंतवायचे आणि देश-राज्याचे भविष्य मारायचे हे अत्यंत घातक आहे. आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत बसलो आहोत, अशी टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.