मुंबई - एक जबाबदार आणि आपल्या सहकाऱ्यांची उत्तम काळजी घेणारे निर्माते आणि अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांची ख्याती आहे. कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर आलेलं सावट पाहता प्रशांत दामले यांनी आपल्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या रंगमंच कामगारांना या कठीण प्रसंगात मदतीचा हात देऊन समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला. कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्यामुळे प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा आज सत्कार करण्यात आला आहे. राजभवनात प्रशांत दामले, सुभाष घई, अलका केरकर यांच्यासह विविध रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिला होता. एकूण 23 जणांना प्रत्येकी 10,000 रुपये दिले होते.
कोरोनामुळे नाट्यव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले. महाराष्ट्रातील कोणत्याही नाट्यगृहात सध्या खबरदारी म्हणून नाटकाचा एकही प्रयोग होत नाही. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल ह्याची अजून खात्री नाही पण तो पर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशांत दामले यांनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. प्रशांत दामलेंप्रमाणेच रंगमंच कामगार संघटनेनेही आपल्या रंगमंच कामगारांना मदतीचा हात दिला आहे