पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत प्रशासन सतर्क

By admin | Published: August 13, 2014 12:48 AM2014-08-13T00:48:40+5:302014-08-13T00:48:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाला अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी, वेळेवर धावपळ नको म्हणून प्रशासनातर्फे आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना

Administration alert about PM's visit | पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत प्रशासन सतर्क

पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत प्रशासन सतर्क

Next

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाला अधिकृत माहिती प्राप्त झाली नसली तरी, वेळेवर धावपळ नको म्हणून प्रशासनातर्फे आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.
मोदी २१ आॅगस्टला येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. कस्तूरचंद पार्कवर विविध विकास योजनांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शासकीय असला तरी त्याला जास्तीतजास्त संख्येने नागपूरकर नागरिक उपस्थित राहावे, त्यादृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून वाट पाहण्यात येत आहे. अधिकृत माहिती आली नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. ठिकठिकाणांहून त्यांना या दौऱ्याबाबत विचारणा केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही राजशिष्टाचार शाखेकडे विचारणा केली आहे. राज्यशिष्टाचार शाखेकडे मोदींच्या सोलापूर दौऱ्याची माहिती आली आहे. पण नागपूरच्या दौऱ्याबाबत त्यांच्याकडे मंगळवार दुपारपर्यंत माहिती आली नव्हती.
पंतप्रधानांसोबत काही केंद्रीय मंत्री आणि राज्यातील विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम कुठल्याही क्षणी येऊ शकतो. त्यामुळे वेळेवर धावपळ नको म्हणून प्रशासनही सतर्क आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांसाठी रविभवनातील सर्व कॉटेज सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
वाहनांची जुळवाजुळव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी लागणाऱ्या वाहनांची जुळवाजुळव प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी विविध विभागांना पत्र पाठविण्यात आले असून वाहने देण्याची विनंती करण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर-विदर्भातील दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्टला नागपूर-विदर्भाच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा शासकीय कार्यक्रम अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, २१ आॅगस्टला पंतप्रधान मोदी सकाळी नागपूर विमानतळावर येतील. येथून ते मौदा येथे कार्यक्रमाला जातील. तेथून वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे एका कार्यक्रमासाठी जातील. देवळीहून नागपूरला परततील. त्यानंतर राजभवनात काही काळ थांबल्यानंतर कस्तुरचंद पार्कवर कार्यक्रमासाठी येतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस, विशेष सुरक्षा पथक, राज्य राखीव दल, गुप्तचर यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणेतील बहुतांश अधिकारी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यासाठी कामी लागले आहेत. दोन दिवसात दिल्लीहून विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) अधिकारी नागपुरात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळांची पाहणी केल्यानंतर एसपीजींचे अधिकारीच सुरक्षा व्यवस्था कशी ठेवायची, ते ठरवतील. पंतप्रधान मोदींच्या प्रवासाचा मार्ग आणि ‘सेफ गार्ड’ही ठरेल. त्यांच्या निर्देशानुसारच पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कोणत्या आणि कशा उपाययोजना करायच्या ते निश्चित होणार आहे.

Web Title: Administration alert about PM's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.