वार्षिक परीक्षेनंतरही शाळा भरणार, 1 मे नंतरच उन्हाळी सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 09:43 AM2018-03-28T09:43:47+5:302018-03-28T10:49:47+5:30
राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा संपल्या असल्या तरी सुद्धा त्यांना शाळेत जावे लागणार आहे. कारण, आता सर्व शाळांना 1 मे नंतरचं उन्हाळी सुट्ट्या लागू होणार आहेत.
मुंबई : राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा संपल्या असल्या तरी सुद्धा त्यांना शाळेत जावे लागणार आहे. कारण, आता सर्व शाळांना 1 मे नंतरचं उन्हाळी सुट्ट्या लागू होणार आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला आहे. त्यामुळे काही शाळांतील वार्षिक परीक्षा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होतात. तर काही विद्यार्थ्यांच्या 20 एप्रिलपर्यंत संपतात. परीक्षा संपल्यानंतर शक्यतो विद्यार्थी शाळेत जात नाहीत, तर थेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी शाळेत जातात. याचबरोबर, अचानक आलेल्या या आदेशामुळे शाळांचे नियोजन कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
संकलित मूल्यमापनाची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन होत नाही, त्यामुळे विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये संकलित चाचणीनंतर उन्हाळी सुट्टी सुरू होईपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असेही या आदेशात म्हटले आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे यासाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन किंवा विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासंदर्भात सरकारने तसे आदेश शाळांना दिले आहेत.