"त्यांनी तारीख जाहीर केली नाही पण..."; महायुतीची बैठक रद्द झाल्यानंतर राहुल शेवाळेंचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:22 PM2024-11-29T14:22:52+5:302024-11-29T14:25:31+5:30
महायुतीची बैठक रद्द झाल्यानंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mahayuti Meeting : महाराष्ट्रात आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आज होणारी महायुतीची बैठक तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी जाणार असून ते उद्या परतण्याची शक्यता आहे. त्याआधी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीत अमित शहांसोबत सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीनंतर तिन्ही नेते मुंबईत परतले असून आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये विभागांची चर्चा करण्यासाठी मुंबईत मोठी बैठक होणार होती. आता या बैठकीबाबत शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अचानक एकनाथी शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघून गेल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आजची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी ते साताऱ्याहून परतल्यानंतर पुन्हा ही बैठक होणार असून त्यात उर्वरित सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हेही शहा यांच्या घरी पोहोचले होते. सुमारे तीन तास ही बैठक सुरू असली तरी मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही.
त्यानंतर महायुतीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द झाल्यानंतर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "गटनेत्यांच्या निवडीची तारीख त्यांनी घोषित केली नाही. गटनेत्यांच्या निवडीची तारीख घोषित होईल आणि त्यांचे निरीक्षक येतील त्यानंतर महायुतीची बैठक होईल. मला विश्वास आहे की येणाऱ्या एक दोन दिवसांत महायुतीची बैठक होईल. काल अमित शाह यांच्याबरोबर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत जी चर्चा झाली आणि ज्या प्रस्तावांवर चर्चा झाली त्यावर केंद्रीय नेत्यांकडून शिक्कामोर्तब होऊन दोन दिवसांत त्याची घोषणा होणार आहे. त्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला घोषित होणार आहे," असं माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
दरम्यान, दिल्लीतल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही रात्री उशिरा मुंबईत परतले. या बैठकीबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक चांगली आणि सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांची मुंबईत दुसरी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केला की मुख्यमंत्रिपदासाठी कोणतेही अडथळे नाहीत आणि "लाडका भाऊ" हे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे.