खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:59 PM2018-10-01T14:59:40+5:302018-10-01T15:01:23+5:30
अधिकाऱ्याला धक्काबुक्की, गाडीला घेराव, राज्य मार्गावर ठिय्या
भंडारा : धान पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे सोमवारी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून वाहनाला घेराव घातला. तसेच रस्त्यावर टायर पेटवून आपला संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी पिके वाळत आहेत. पाणी सोडण्यासाठी विनंती करूनही पेंच प्रकल्प पाणी सोडत नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात खुर्शीपार येथे आंदोलन सुरू करण्यात आले. भंडारा-रामटेक राज्य मार्गावरील खुर्शीपार येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको केला. याठिकाणी सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन सोनटक्के पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्यात प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून धक्काबुक्की केल्याचे समजते.